अनिल केऱ्हाळे, जळगावः जळगाव दूध महासंघ निवडणूक (Jalgaon Milk Federation) जवळ येतेय, तशा मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिंदे-भाजप पॅनलचे संजय पवार (Sanjay Pawar) आणि दिलीप वाघ यांच्याबाबतीत तर कहरच झाला. संजय पवार यांनी आधी बंद दाराआड एकनाथ खडसेंसोबत चर्चा झाली. नंतर अजित पवार (Ajit Pawar) यांना फोनवर शब्दही दिला. त्यांतरही ते पळून गेले. एकनाथ खडसे यांनीच हा आरोप केलाय. शिंदे गटाकडे गेलेल्या संजय पवार यांच्या शिंदे गटाकडे पळून जाण्याची मोठी चर्चा सध्या रंगली आहे. तर दुसरीकडे दिलीप वाघ यांनाही गळाला लावण्यात गिरीश महाजन यांना यश आलंय. उमेदवारी अर्ज माघारीच्या काही मिनिटं आधी ते बिनविरोध निवडून आले.
जळगाव दूध महासंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. काल 28 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती. महाविकास आघाडी आणि शिंदे-भाजप पॅनलच्या महत्त्वाच्या उमेदवारांची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन्हीकडून जोर लावण्यात आला. यात खेचाखेचीत शिंदे गटाने बाजी मारल्याचे दिसून आले.
संजय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. मात्र जिल्हा दूध संघाची निवडणूक ते शिंदे-भाजप पॅनलकडून लढवत होते. एकनाथ खडसे यांच्या आरोपांनुसार संजय पवार यांनी मला बिनविरोध करा, मी तुमच्याकडे येतो, अशी अट टाकली. यानंतर अजित पवार यांच्याशी फोनवर चर्चाही केली. पण तुमचा हा निर्णय पत्रकार परिषद घेऊन जाहीर करा, असे खडसेंनी सांगितलं. मात्र त्यानंतर संजय पवार पळून गेले, परत आलेच नाहीत, असा आरोप खडसे यांनी केला.
दरम्यान, मी शिंदे-भाजपकडूनच निवडणूक लढवणार होतो. तडजोडीची अट मविआनेच टाकली होती. मी पळून गेलेलो नाही, शब्द पाळणारा आहे, अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली. दरम्यान या वर्तणुकीनंतर संजय पवार यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
तर पाचोरा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांनीही दगा दिला. दिलीप वाघ यांना शिंदे-भाजपा पॅनलच्या गळाला लावण्यात गिरीश महाजन यांना यश आले. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही मिनिटं शिल्लक असताना ही घडामोड झाली. पाचोरा मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी माघार घेतली. तर दिलीप वाघ यांचा बिनविरोध विजय झाला.
एकूणच दूध महासंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. आज उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्हांचे वाटप केले जाईल.