जळगाव : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी बोलताना आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. त्यानंतर पंकजा यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होतेय. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आज एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत. या भेटीआधी त्यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे यांचं विधान दुःखद आणि वेदनादायी आहे, असं एकनाथ खडसे म्हणालेत. गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी पक्षासाठी उभा आयुष्य घातलं. पंकजा मुंडे यांची अशी अवस्थता असणं म्हणजे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. भाजप पक्ष वर्षांवर्ष ज्यांनी वाढवला. बहुजनांपर्यंत पोहोचला. अशा जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये छळ होतोय, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय समाज पक्षाने दिल्लीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.
भाजप माझा थोडी आहे. मी भाजपात आहे. भाजप पक्ष मोठा आहे. मुंडे साहेब होते तेव्हा छोट्या-छोट्या माणसांना घेऊन बनवलं. तेव्हा पक्षाने सत्तेचं तोंड पाहिलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांच्या भाषणावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसे आज पंकजा मुंडे यांना भेटणार आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर जाणार आहेत. याभेटीदरम्यान खडसे-मुंडे भेटीत राजकीय चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. “महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री #गोपीनाथराव_मुंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली !”, असं खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.