जळगाव | 31 जुलै 2023 : ठाण्यातील उद्धव ठाकरेंची सभा हा त्यांचा केविलवाणा प्रयोग असून मराठी मतदारांना सोडून उद्धव ठाकरे आता उत्तर भारतीयांना जमा करत असल्याचा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तसंच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. तसंच काही सर्व्हे समोर आले आहेत. यात कोणत्या पक्षाचे किती नेते निवडून येतील हे सांगण्यात आलं आहे. त्यावरही महाजन यांनी भाष्य केलं आहे.
कोरोना काळात उद्धव ठाकरे कधी घराबाहेर पडले नाही मात्र आता मी लोकांची कशी सेवा केली हे आता सांगत आहेत मात्र कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी कसा घोटाळा केला हे लवकरच समोर येणार असून कोरोना काळात मदत केली की मेलेल्या लोकांवर त्या टाळूचं लोणी खाल्लं हे लवकर स्पष्ट होईल, असा हल्लाबोलही गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात आम्ही एकत्र आल्यास महाराष्ट्रातील चित्र बदलू शकतं, असं विधान शरद पवार यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. मात्र तुम्ही तिघेही एकत्र आहात. त्यामुळे प्रयत्न करा. महाराष्ट्रभर फिरून लोकांमध्ये जागृती करा आणि पुन्हा निवडून या, असा खोचक सल्ला गिरीश महाजन यांनी शरद पवारांना दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान व्हावं असंही त्यांच्या जवळ असलेल्या चार-पाच लोकांना वाटतं. मात्र नेत्यांच्या प्रेमापोटी लोक असे पोस्टर बॅनर लावत असतात. बोटावर मोजण्या इतके चार पाच आमदार राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडे आहेत. त्यामुळे ते आमदार आपल्याकडे शिल्लक राहिले पाहिजेत. कार्यकर्ते जिवंत राहिले पाहिजे म्हणून अशा काही गप्पा त्यांना करावा लागतात, असा टोलाही गिरीश महाजन यांनी शरद पवारांना लगावला आहे.
राज्यात सत्ताधारी पक्षाला आगामी निवडणुकीत कमी जागा मिळणार असल्याचे एका सर्व्हेत समोर आलं आहे. मात्र सर्व्हेला किती महत्त्व द्यावं हा जाता त्याचा विषय असून आता कुठे तीन पक्ष एकत्र आलेले आहे त्यामुळे असे अनेक सर्व्हे होतील, असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे.
मी पण महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री म्हणून सर्व्हे करून दाखवू शकतो. जे दोन वर्ष घराच्या बाहेर पडले नाहीत. घरातच बसून ज्यांनी कर्तबगारी दाखवली ते देशात सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणून घेतात. सामनातून मुलाखत तुम्हीच घेणार मास्तरही तुमचा प्रश्नपत्रिकाही तुमची उत्तर काय द्यायचे. हे तुमच्या हातात त्यामुळे दोन वर्षात उद्धव ठाकरे काय करत होते हे सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे अशा सर्व वर फार विश्वास ठेवू नका, असं देखील गिरीश महाजन म्हणाले आहेत.