जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. थोडीफार तरी लाज-शरम शिल्लक असेल तर खासदारकी परत करा. आम्ही मतं दिली म्हणून तुम्ही खासदार झालात आणि आम्हालाच नालायक म्हणतात, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी संजय राऊत यांच्यावर पुन्हा जोरदार टीका केली आहे. तसंच धरणगावच्या हंडा मोर्चावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील जळगावात आहेत. तिथे त्यांनी अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी शिवसेनेच्या नेत्यावर प्रतिक्रिया देताना थुंकल्याचं पाहायला मिळालं. यावरून राजकारण तापलं आहे. शिवसेना आणि भाजप त्यांच्यावर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे. यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावं. म्हणजे कुणी कुणाला थू केलं हे लक्षात येईल, अस आव्हान मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.
वारंवार संजय राऊत कुणा ना कुणावर टीका करत असल्यानं ठाण्यामध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या वाढवली असल्याचं उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.
शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये वाचाळवीरांची संख्या जास्त आहे, असं ठाकरे गटाच्या वतीने म्हणण्यात येतं. त्या टीकेवरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे. कोण वाचाळवीर आहे. त्यांची संख्या जाहीर करावी, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे..
गुलाबराव पाटील यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने धरणगावातून विरोधकांकडून हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की, निश्चितच योजनेला उशीर होत आहे. नवीन पाईपलाईनचे काम सुरू आहे तसेच त्यावरून नळ जोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे निश्चितच त्याला विलंब लागतोय. तसंत माझा वाढदिवस असल्याने मला विरोधक उद्या वाढदिवसाचे सप्रेम भेट देत आहेत, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.