जळगाव | 05 सप्टेंबर 2023 : जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तसंच पोलिसांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. यात अनेक आंदोलक जखमी झाले. या सगळ्याचे राज्यभर पडसाद उमटले. अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. या घटनेतचा निषेध करण्यात आला. यानंतर ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितली. यावर राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागणं म्हणजे एकप्रकारे गुन्ह्याची कबुलीच देणं आहे, असं शरद पवार म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मराठा समाजाची जाहीर माफी मागितली आहे. 2014 लाही युतीचं सरकार सत्तेत होतं. यावेळी आमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाने पाच हजार आंदोलनं केली. त्यावेळी कधीच बळाचा वापर केला नाही. पण आता बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे. लोक जखमी झाले आहेत. त्यांची मी क्षमा याचना करतो. मराठा समाजाची क्षमा मागतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मागच्या अनेक वर्षांपासून मराठा आंदोलनाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजतही आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोक आहेत. त्यामुळे आरक्षण दिलं जावं, अशी मागणी होत आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसीमधील गरीबांवर अन्याय होईल. 50 टक्के आरक्षण मर्यादा वाढवण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.
जालन्यात मराठा आंदोलकावंर जो लाठीचार्ज झाला. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. तसंच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, असा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत विरोधकांना चॅलेंज दिलं. आम्हा तिघांपैकी एकाने जरी गोळाबाराचे आदेश दिले असतील तर राजकारण सोडतो. पण तसं घडलं नसेल तर त्यांनी राजकारण सोडावं, असं अजित पवार म्हणाले. त्याला शरद पवार यांनी उत्तर दिलं. मला इतकं माहिती आहे की जालन्यात संध्याकाळच्या सुमारास हल्ला झाला. तिथं पोलिसांनी हल्ला केलाय हे उघडपणे दिसतं. याची चौकशी सरकारने करावी. याचे अधिकार सरकारला आहेत. आम्हाला ते अधिकार नाहीत, असं शरद पवार म्हणाले.