जालना | 04 सप्टेंबर 2023 : अंतरवाली सराटी झालेल्या लाठीमार आणि गोळीबार प्रकरणाची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यात आले. त्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. या घटनेची माहिती घेतली. तसंच मागण्याही जाणून घेतल्या. यावेळी उपस्थितांना राज ठाकरे यांनी संबोधित केलं. तेव्हा त्यांनी पोलिसांना लाठीचार्जचे आदेश कुणी दिले?, असा सवाल विचारला. शिवाय हे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला, असं राज ठाकरे म्हणाले. मी आज भाषण करायला नाही आलो.तर आवाहन करायला आलोय. ज्या लोकांनी तुमच्यावर गोळ्या चालवण्याचे आदेश दिले त्यांना मराठवाड्यात यायला बंदी घाला. त्यांना मराठवाड्यात पाय ठेवू देऊ नका. जोवर झालेल्या प्रकाराची माफी मागत नाहीत. तोवर त्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
मराठा समाज या आधीही जेव्हा आरक्षणासाठी मोर्चे काढत होता. तेव्हाही मी सांगत होतो की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. हे लोक फक्त तुमचा वापर करतील मतं पदरात पाडून घेतील आणि तुम्हाला विसरून जातील. कधी हे सत्तेत तर कधी हे विरोधी पक्षात… विरोधातले मोर्चे काढणार आणि हेच पुन्हा सत्तेत आले की गोळ्या झाडतात. पोलिसांना दोष देऊ नका. पोलिसांना आदेश ज्यांनी दिले त्यांना दोष द्या. त्यांना मराठवाड्यात पाय ठेवू देऊ नका, असं म्हणत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, झालेल्या घटनेचं राजकारण करू नये. अरे वाह… हे जर विरोधी पक्षात असते. तर यांनी हेच राजकारण केलं असतं ना… मी इथं राजकारण करायला नाही आलो. पण लाठीमाराचे व्हीडिओ पाहिले. राहावलं नाही म्हणून भेटायला आलोय. या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईल आणि या भेटीत त्यांच्या कानावर हा विषय टाकेन, असं राज ठाकरे म्हणाले.
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचा आज 7 वा दिवस आहे. मनोज जरांगे यांचं जलत्याग आमरण उपोषण सुरूच आहे. मनोज जरांगे पाणीही घेत नाहीत माहिती आहे. लाठीचार्ज झालेल्या दिवसापासून पाण्याचाही त्यांनी त्याग केला आहे. अन्न आणि पाण्याचा त्याग करून जरांगे उपोषण सुरू आहे. मनोज जरंगे हे मराठा समाजाच्या आरक्षणावर आजही ठाम आहेत. चर्चेची पहिली फेरी काल निष्फळ ठरल्यानंतर आंदोलन सातव्या दिवशी सुरूच आहे. जरांगे उपोषण करत असलेल्या ठिकाणी जात राज ठाकरे यांनी भेट घेतली. तसंच त्यांच्याशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली.