पुणे : विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून कोथरुड मतदारसंघ रोज चर्चेत आहे. ब्राह्मण महासंघाचा भाजपचे कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांच्या उमेदवारीला (Jamyang Tsering Namgyal) असलेला विरोध, बाहेरचा नको, घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे… यावरून झालेली फ्लेक्सबाजी असो…कोथरुड सतत चर्चेत आहे. आता कोथरुडमध्ये लडाखच्या खासदाराची (Jamyang Tsering Namgyal) चर्चा सुरु झाली आहे.
कोथरुडमध्ये ‘एक चर्चा कलम 370, 35 अ आणि लडाखवर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. लडाखचे खासदार जामयांग नामग्याल आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकात पाटील हे दोघे या चर्चेत सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे पुण्यातल्या काही संस्थांनी एकत्र येत बालगंधर्व रंगमंदिरात ‘पुणे – लडाख नवे मैत्री पर्व’ हा कार्यक्रम आयोजित केलाय.
खासदार जामयांग नामग्याल यांच्यासह मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन कळमकर हे यात सहभागी होणार आहेत. ऐन निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत कोथरुडमधले मूळ प्रश्न बाजूला ठेऊन कलम 370 वर चर्चा करुन नेहमीप्रमाणे भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचं मत जेष्ठ संपादक अरुण खोरे यांनी व्यक्त केलंय.
कलम 370 आणि 35 अ यावर चर्चा करण्यापेक्षा मागील पाच वर्षात राज्य सरकारने आणि मागील तीन वर्षात महापालिकेने पुण्याला काय दिलं यावर शहरातील सर्व 8 मतदारसंघात चर्चा करावी, आम्हालाही हे मिस्टर इंडिया सारखे काम कळेल, अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कोथरुड म्हणजे ‘पाटील ऑक्युपाय कोथरुड’ अशी टीकाही विरोधक करत आहेत. मतदारसंघातील मूळ प्रश्न बाजूला ठेवत, बाहेरच्या उमेदवाराप्रमाणेच प्रचारात बाहेरचे मुद्दे चर्चेत आणून मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.
दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी मात्र विरोधकांचे हे आरोप खोडून काढतात. कोथरुड ते काश्मीरपर्यत आमचं लक्ष आहे. जे केलं ते आम्ही सांगत असू तर त्यात वावगं काय? असा उलट प्रश्न भाजप पदाधिकारी विचारत आहेत. विरोधकांना विरोधासाठी मुद्दे शिल्लक नसल्याने तेच राजकारण करत असल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
पुण्यात निवडणुकीच्या निमित्ताने मूलभूत प्रश्न बाजूला पडले असून काश्मीर आणि लडाखची चर्चा सुरु आहे. सुज्ञ पुणेकर वाहतूक कोंडी, आर्थिक मंदी, बेरोजगारी, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य यासारख्या मुद्द्यांचा विचार करणार की भाजपने चर्चेला आणलेल्या कलम 370 च्या भावनिक मुद्दाला साथ देणार हे येणाऱ्या 24 तारखेलाच स्पष्ट होईल.
VIDEO : जामयांग नामग्याल यांचं गाजलेलं भाषण