भाजप ज्यांचा बाप काढत आहे, त्यांनी मनात आणलं तर मुंबईत फिरणं अशक्य होईल : जयंत पाटील

| Updated on: Feb 03, 2020 | 3:41 PM

भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे (BJP remark on Uddhav Thackeray).

भाजप ज्यांचा बाप काढत आहे, त्यांनी मनात आणलं तर मुंबईत फिरणं अशक्य होईल : जयंत पाटील
Follow us on

मुंबई : भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे (BJP remark on Uddhav Thackeray). जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप ज्यांचा बाप काढत आहे, त्यांनी मनात आणलं तर मुंबईत फिरणं अशक्य होईल, असा थेट इशारा दिला आहे (BJP remark on Uddhav Thackeray). आशिष शेलार यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू न करायला हे बापाचं राज्य आहे का, असं विधान केलं होतं. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

जयंत पाटील म्हणाले, “भाजपनं इतकं घसरण्याची गरज नाही. मला वाटतं त्यांना आशा होती, ती पूर्ण झाली नाही. म्हणूनच भाजप चिडली आहे आणि बाप काढण्याच्या पातळीवर गेली. आपण कुणाचा बाप काढतो आहोत याचंही यांना भान राहिलेलं नाही. ते ज्यांचा बाप काढतात त्यांनी जर मनात आणलं तर यांना मुंबईत फिरणं देखील अशक्य होईल. मात्र, इतकी पातळी घसरण्याची भाजपवर का वेळ आली यावर भाजपनं आत्मचिंतन करावं.”

“आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातील नाही”

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील आशिष शेलार यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले, “आशिष शेलार जे बोलले ते मला खूप आवडलं. मी त्यांना आजच सांगतो की होय हे उद्धव ठाकरेंच्या बापाचंच राज्य आहे. हे जितेंद्र आव्हाडच्या बापाचंच राज्य आहे. काळ्या मातीला सह्याद्रीच्या पर्वताला मानणारे आम्ही काळ्या मातील आई मानतो आणि मराठी माणसाला आमचा बाप मानतो. हे मराठी मनाचं राज्य आहे, असं देशभरात-जगभरात सांगणाऱ्यांची आम्ही औलाद आहोत. आम्ही आमचा बाप गुजरातमध्ये शोधायला जात नाही.”

व्हिडीओ :