अहमदमगर : राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजप नेत्यांकडून वारंवार महाविकास आघाडी कधी कोसळणार याच्या तारखा जारी केल्या जायच्या. त्यांनी केलेल्या विविध दाव्यांनंतर अखेर महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षच आपला कार्यकाळ पूर्ण करु शकली. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झालं. या नव्या सरकारला स्थापन होऊन अवघे साडेतीन महिने पूर्ण होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते जयंत पाटील यांनी हे सरकार नेमकं कधी कोसळणार याबाबतचा मुहूर्तच सांगितला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिर्डीत मंथन शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. हे शिबीर झाल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळेल, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
“शिर्डीत काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर मविआ सरकार पडलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीतील शिबीर झाल्यानंतर हे सरकार पडेल”, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय.
खरंतर खासदार सुजय विखे पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील कार्यक्रमावर टीका केली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपात विलीन होईल, असा धक्कादायक दावा सुजय विखेंनी केला होता. त्यांच्या या टीकेला जयंत पाटील यांनी आज प्रत्युत्तर दिलं.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातील सर्वात खंबीर पक्ष आहे. आपल्या गावचा असा पायगुण आहे हे स्वत:चं जाहीर करणं यासाठी खासदारांच कौतुक”, असा टोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.