सांगली : राजकारणात करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी ओळखले जाणारे, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची (NCP State President) जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे, आपल्या खास शैलीत, ठेवणीतील शब्दांनी विरोधकांवर निशाणा साधणारे मुरब्बी राजकारणी म्हणून जयंत पाटील (Jayant Patil) यांची ओळख आहे. हेच जयंत पाटील आज वेगळ्या रुपात पाहायला मिळाले. पाटील यांनी आज थेट लालपरीचं स्टेअरिंग हाती घेतलं. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त इस्लामपुरातील (Islampur) बस आगारात आज उत्साहपूर्ण वातावरण आहे. आपली लालपरी दिमाखात सजली आहे. महाराष्ट्रातील खेड्यापाड्याना जोडणाऱ्या या लालपरीचे चालकाच्या मार्गदर्शनाने सारथ्य करण्याचा योग आला, अशी माहिती जयंत पाटील यांनी ट्वीटरवरुन दिलीय.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त इस्लामपुरातील बस आगारात आज उत्साहपूर्ण वातावरण आहे. आपली लालपरी दिमाखात सजली आहे. महाराष्ट्रातील खेड्यापाड्याना जोडणाऱ्या या लालपरीचे चालकाच्या मार्गदर्शनाने सारथ्य करण्याचा योग आला. #IndiaAt75 pic.twitter.com/rKsLC6FJm6
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 15, 2022
75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जयंत पाटील आज तहसील कार्यालय इस्लामपूर तसंच राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहिले. त्यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार आणि उपस्थित नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. तसंच इस्लामपूर शहरातील आंबेडकर स्मारक येथे आयोजित कार्यक्रमातही जयंत पाटील उपस्थित राहिले.
आज तहसील कार्यालय इस्लामपूर तसेच राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने आयोजित ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहीलो. स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. #IndiaAt75 #IndependenceDay #स्वतंत्रतादिवस pic.twitter.com/UVAAs5wjTJ
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 15, 2022
दुसरीकडे खातेवाटपावरुन काही मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. त्याबाबत जयंत पाटील यांनी रविवारी खोचक प्रतिक्रिया दिली. खाते वाटप करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. शिंदेंनी किती जणांची मनं सांभाळायची. त्यामुळे आता सगळ्यांनी मिळून एकनाथ शिंदे यांना समजून घ्यावं, असा उपरोधिक टोला पाटील यांनी लगावला. तसंच एक समाधानकारक गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनी खातं असणारे मंत्री झेंडावंदन करतील. महाराष्ट्रातील समस्या सोडवण्यासाठी खात्यासहित मंत्री महाराष्ट्राला आता मिळाले आहेत. त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो, असा टोलाही पाटील यांनी लगावला होता.