मुंबईः महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्यापासून सुप्रीम कोर्टात (Supreme court)अंतिम सुनावणीला सुरुवात होतेय. राज्यातील जनतेचं या महाखटल्याकडे लक्ष लागलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे सरकार काही दिवसात कोसळेल, अशी वक्तव्य राष्ट्रवादी (NCP) तसेच इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार केली जात आहेत. त्याचा नेमका आधार काय असा प्रश्न विचारला असता, जयंत पाटील यांनी हे उत्तर दिलंय. राज्याच्या सत्ता संघर्षाची सुनावणी येत्या काही दिवसात पूर्ण होईल. कायद्यानुसार निकाल दिला गेला तर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरतील आणि हे सरकार बेकायदेशीर असल्याचं सिद्ध होईल, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. सरकार अस्थिर असून त्यांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असल्याचं पाटील म्हणाले. टीव्ही ९ मराठी आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते.
राज्यात राजकीय स्थैर्य आहे, असं वाटतं का, या प्रश्नाचं उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, ‘ अस्थिरता आहे. राज्याच्या सरकारवर टांगती तलवार आहे. सत्तारुढ लोकांच्या मनातच अस्थिरता आहे. पुढं कसं होणार, या चिंतेने चिंता आहे. कारण सरकारने जे कृत्य केलंय, हे बेकायदेशीर आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
राष्ट्रवादी ,काँग्रेस तसेच शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार शिंदे सरकार कोसळण्याची वक्तव्य होतायत. ती कोणत्या आधारावर असं विचारलं असता जयंत पाटील म्हणाले, सुप्रीम कोर्टाने फार दिवस लावलेत. एखाद्या राज्यात बेकायदेशीर सत्ता ग्रहण केली असेल तर तातडीने त्या केस निकालात काढणं हे आवश्यक होतं. पण कोर्टाने तारखावर तारखा दिल्या. बेकायदेशीर सत्तेत असलेल्या सरकारला दीर्घकाळ काम करण्याची संधी दिली. त्यामुळे संशयाची जागा निर्माण व्हायला वाव आहे. आम्ही तारखा देतोय, त्या याच आधारावर…
सुप्रीम कोर्टाचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल, यावर अंदाज व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले, ‘ 16 जणांची सुनावणी सुरु झाली आहे. 5-6 दिवसात निकाल येणार. कायद्यानुसार निर्णय झाला तर सरकार अवैध ठरेल. पण अलिकडे न्यायाधीश रिटायर्ड झाल्यावर त्यांना राज्यपाल करण्यात येतं, त्यामुळे कधी काय होईल, काही सांगता येत नाही…