पुणे : नेहमी आपल्या सोबर आणि अभ्यासू भाषणाने सभा गाजवणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Shirur Jayant Patil) मात्र चांगलेच आक्रमक झालेले दिसले. शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारच्या प्रचारासाठी शिरुर शहरातल्या पाचकंदील चौकात आयोजित केलेल्या सभेत जयंत पाटील यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. कारखान्याच्या सभासदांना माकड म्हणणारे भाजपचे उमेदवार आणि आमदार बाबुराव पाचर्णे यांना घरी पाठवा, असंही आवाहन त्यांनी (Shirur Jayant Patil) केलं.
ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलेलं आहे, अशांचा निर्णय उद्या (रविवार) सकाळपर्यंत पक्ष कार्यालय घेईल आणि अशांना हाकलून देण्याचं काम केलं जाईल. पक्ष स्वच्छ करायचा आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
शरद पवार साहेबांवर निष्ठा नसणारे, पक्ष विरोधी कारवाया करणारे आणि पक्ष सोडून गेलेल्या गद्दारांची गय करणार नाही. लोक मला विचारतात अनेक जण पक्ष सोडून जातात, कसं वाटतं? तर मी म्हणतो चांगलं वाटतं. यापूर्वी जी मंडळी पक्षात होती, त्यांच्यामुळे पक्ष अडचणीत आला होता, आज ते नाहीत ते एका अर्थाने बरं आहे, असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला.
या निवडणुकीच्या काळात अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेना-भाजपचा झेंडा हाती घेतला. तर अनेकांनी बंडखोरीही केली. स्थानिक पातळीवर काही जण राष्ट्रवादीत असून भाजप आणि शिवसेनेला मदत करत आहेत. या सर्वांची गय केली जाणार नाही, असा इशारा जयंत पाटलांनी दिलाय.