सोलापूर : विचित्र हावभाव करत बेधुंद होऊन नाचणाऱ्या एका साधूचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोलापूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेले डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या व्हिडीओशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचं समोर आलं आहे. तर याप्रकारे व्हिडीओ व्हायरल करुन महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली. याप्रकरणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापुरात डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे नाव लोकसभा निवडणुकांच्या काळात समोर आलं. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे सोलापुरातून लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या नावावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओमध्ये बेधुंद होऊन नाचणारे एक साधू महाराज दिसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला.
दुसरीकडे, अशा प्रकारचा व्हिडीओ व्हायरल करुन महाराजांची बदनामी करण्यात आली, तसेच त्यांच्या भावनाही दुखावल्या गेल्या, असा आरोप समर्थकांनी केला. या प्रकरणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सुमित भोसले, मुग्धा कर्णिक यांच्या विरोधात हिंदूमहासभेच्या सुधाकर बहिरवाडे यांनी तक्रार केली आहे. फौजदार चावडी पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू महासभेच्या तक्रारीनंतर शिवसेनेनेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार केली.
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या नावावर टाकलेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील एका लग्न समारंभातील आहे. पहिल्यांदा हा व्हिडीओ 1 ऑगस्ट 2013 ला युट्यूबवर टाकण्यात आला होता. त्यात ‘मेरे पिंजरे मे पोपट बोले’ आणि ‘बदले मे यूपी बिहार लेले’ या गाण्यावर हा साधू नाचत होता. त्यानंतर 27 जुलै 2013 ला या गाण्यात बद्दल करून कन्नड गाण्यावर साधू नाचत असल्याचं भासवण्यात आलं. निवडणुकीच्या तोंडावर हाच व्हिडीओ पुन्हा व्हायरल करण्यात आला. या व्हिडीओचा संबंध सोलापूर लोकसभेचे उमदेवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांशी लावण्यात आला. मात्र, त्यांचा या व्हिडीओशी काहीही संबंध नसल्याचं समोर आलं.
पाहा व्हिडीओ :