मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शुक्रवारी पक्षाविरोधात भूमिका जाहीर केली. शिवाय बीडमध्ये भाजपच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्याचाही संकल्प केला. त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्याची माहिती आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासह यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांचीही उपस्थिती होती. जयदत्त क्षीरसागर यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.
बीडमध्ये प्रितम मुंडेंना मदत
जयदत्त क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली. 35 वर्षांचं नातं घट्ट राहू द्या, असं म्हणत जयदत्त क्षीरसागरांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या एका शब्दामुळे मी जयसिंगराव गायकवाड यांना निवडून आणलं. पण सध्या राष्ट्रवादीत काय सुरू आहे माहीत नाही. पक्ष कोण चालवतोय माहीत नाही. मला पक्षाने मजबूर केलंय. पण मी मजबूर नाही, तर मजबूत आहे, असं जयदत्त क्षीरसागर म्हणाले.
राष्ट्रवादीत सध्या आऊटगोईंग सुरू आहे. मी खूप संयमी आहे. मी काहीही बोलत नाही. पण माझा सयंम हा कमकुवत नाही, तर स्वभाव आहे. सयमांच्या सीमेचा बांध तुटायला लागला आहे. माझं घोडं तुमच्याकडे अडकलं नव्हतं. माझं मन खच खाल्लं होतं. मी कधीही जातीवाद केला नाही, असं म्हणत जयदत्त क्षीरसागर यांनी सध्याच्या राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली.
संबंधित बातम्या :