सुरेश धस पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावर, मुलाचा अपक्ष अर्ज दाखल

| Updated on: Oct 03, 2019 | 6:05 PM

सुरेश धस यांची ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॅलीलाही उपस्थिती होती, तर त्यांच्या मुलाने अपक्ष अर्ज दाखल केलाय. त्यामुळे पंकजा मुंडे याबाबतीत काय निर्णय घेतात ते महत्त्वाचं ठरणार आहे.

सुरेश धस पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावर, मुलाचा अपक्ष अर्ज दाखल
Follow us on

बीड : भाजपचे आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस (Jaydutt Dhas) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. जयदत्त (Jaydutt Dhas) यांनी अर्ज दाखल केलेल्या आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघासाठी भाजपने भिमराव धोंडे यांना उमेदवारी दिली आहे. पण जयदत्त यांच्या अर्जामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे सुरेश धस यांची ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॅलीलाही उपस्थिती होती, तर त्यांच्या मुलाने अपक्ष अर्ज दाखल केलाय. त्यामुळे पंकजा मुंडे याबाबतीत काय निर्णय घेतात ते महत्त्वाचं ठरणार आहे.

सुरेश धस यांचे चिरंजीव गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघात गाठीभेटी घेत आहेत. पक्षाने अधिकृत उमेदवारी द्यावी, अशी त्यांची इच्छा होती. पण पुन्हा एकदा भिमराव धोंडे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. मतदारसंघात धोंडे यांना विरोध असल्याने दुसरा उमेदवार द्यावा, असं धस गटाचं म्हणणं आहे. पण पक्षाने पुन्हा एकदा धोंडे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं.

सुरेश धस हे राष्ट्रवादीत असताना आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघाचे आमदार होते. पण 2014 ला भिमराव धोंडे यांनी त्यांचा पराभव केला. धस सध्या विधानपरिषदेवर आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलाने विधानसभेची तयारी सुरु केली होती. अर्ज दाखल करण्याची 4 ऑक्टोबर ही अखेरची तारीख आहे. जयदत्त यांनी अर्ज मागे न घेतल्यास इथे भाजपच्या अधिकृत उमेदवाराची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे.