मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांची काल ईडीने (ED) तब्बल 16 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. राऊत रात्रभर ईडीच्या कार्यालयात होते. आज दुपारी साडे बारा वाजता त्यांना ईडीचे अधिकारी मेडिकल चेकअपसाठी जेजे रुग्णालयात घेऊन निघाले होते. राऊत यांना ईडीच्या कार्यालयातून बाहेर आणताच राऊतांनी दोन्ही हात उंचावून लोकांना अभिवादन केलं. मीडियाकडे पाहून हाताचा अंगठाही दाखवला. आपण ठिक ठिक आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही, असंच राऊत दाखवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता किंवा तणाव नव्हता. उलट राऊत फ्रेश वाटत होते. आपल्या खास स्टाईलने ते मीडियाकडे पाहत हातवारेही करताना दिसत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात (maharashtra) काय चाललंय हे तुम्हाला माहीतच आहे. पण आम्ही झुकणार नाही, असं राऊत म्हणाले.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर काल छापा मारण्यात आल्यानंतर राऊत यांच्या चेहऱ्यावर तणाव होता. ते चिंतातूर दिसत होते. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत जाताना राऊत यांनी काही झालंच नाही अशा पद्धतीने हातवारे करत ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत गेले होते. त्यानंतर त्यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली आणि रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी अटक करण्यात आली. त्यामुळे राऊत यांच्या अडचणी वाढणार असल्याचे संकेत मिळत होते. कालची रात्र राऊत यांना ईडीच्या कार्यालात राहावे लागले. आज दुपारी ईडीचे अधिकारी त्यांना जेजे रुग्णालयात घेऊन गेले.
राऊत ईडीच्या कार्यालयाबाहेर पडल्यानंतर दोन्ही हात उंचावून त्यांनी लोकांना अभिवादन केलं. त्यानंतर पुन्हा एक हात उंचावला. त्यांच्या गळ्यात भगवा गमछा होता. त्यानंतर ते ईडीच्या गाडीत बसले. गाडीत बसल्यानंतरही ते हातवारे करत होते. मीडियाकडे बघून हात उंचावत होते. त्यांच्या चेहऱ्यावर तसूभरही तणाव नव्हता. चिंता नव्हती. किंवा अपराधीपणाची भावनाही नव्हती.
ईडीची धाड पडल्यानंतर अटक होणार असल्याची राऊत यांना कुणकुण लागली होती. यावेळी त्यांनी झुकणार नाही, असं ट्विट केलं होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो मी काहीच चुकीचं केलं नाही, असं ते म्हणाले होते. आजही जेजे रुग्णालयात आणल्यावर त्यांनी महाराष्ट्रात काय चाललंय हे आपण पाहतच आहात. पण आम्ही झुकणार नाही, असं राऊत म्हणाले.
दरम्यान, मेडिकल चेकअपनंतर संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. कोर्टात हजर केल्यानंतर कोर्ट त्यांना कोठडी देते की जामीन हे पाहावं लागणार आहे.