मुंबई : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देऊन एक दिवस उलटत नाही, तोच बिग बींनी ‘झुंड’ चित्रपटाची तारीख जाहीर केली. त्यानंतर पटोलेंनी अमिताभ बच्चन यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचं स्पष्ट केलं. (Jhund Movie Amitabh Bachchan Vs Congress State President Nana Patole)
काँग्रेस लोकशाही पद्धतीने आधीपासूनच इंधन दरवाढीचा विरोध करत आलं आहे. जिथे अमिताभ बच्चन किंवा अक्षयकुमारच्या सिनेमाचं शूटींग सुरु असेल, तिथे काळे झेंडे दाखवणार, अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक सिनेमापूर्वी काँग्रेस कार्यकर्ता काळे झेंडे दाखवेल. प्रत्येक सिनेमापूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते सिनेमा थिएटरबाहेर काळे झेंडे दाखवून विरोध करणार, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
झुंड कधी प्रदर्शित होणार?
मराठमोळ दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित आणि ‘बिग बी’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित झुंड (Jhund movie) या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक टीझर यापूर्वीच रिलीज झाला होता. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची उत्सुकता लागली होती. अखेर बिग बी अमिताभ बच्चन यांनी स्वत: नागराज मंजुळेच्या या सिनेमाची तारीख जाहीर केली. येत्या 18 जूनला झुंड हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर झुंडची रिलीज डेट जाहीर केली. झुंडच्या पोस्टरसह अमिताभ बच्चन यांनी कॅप्शन लिहिलं, “कोरोनाने आपल्याला अनेक झटके दिले, मात्र आता पुनरागमन करण्याची वेळ आली आहे. आपण थिएटर्समध्ये परतलो आहोत. झुंड सिनेमा 18 जून 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे”
नाना पटोलेंचा इशारा काय?
मनमोहन सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही तसेच त्यांचे सिनेमे प्रदर्शितही होऊ देणार नाही, असा सक्त इशारा नाना पटोले यांनी दिला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पटोलेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. (Jhund Movie Amitabh Bachchan Vs Congress State President Nana Patole)
“अमिताभ बच्चन-अक्षय कुमार गप्प का?”
देशात आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. पण तरीही इंधन दरवाढीवरून कोणी बोलायला तयार नाहीत. काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढीवरून टीव टीव करणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार आता गप्प का आहेत? आता त्यांना इंधन दरवाढ दिसत नाही का? असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला होता.
पुण्यात सेना-राष्ट्रवादीची आघाडी, काँग्रेसचं काय?
दरम्यान, स्थानिक कार्यकर्त्यांचं मत विचारात घेत पुण्यात महाविकास आघाडी करण्याबाबत निर्णय घेऊ, मैत्रीपूर्वक लढत होऊ शकते, पाठून वार करण्याची आमची भूमिका नाही, असं नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केलं. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुणे महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढतील, अशी घोषणा केली. राज्यात जी महाविकास आघाडी आहे, ती भाजपला थांबवण्यासाठी आहे. भाजप देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवत आहे. भाजप देशाला तोडण्याचं काम करत आहे, आम्ही आघाडीसोबत आहोत, असंही नाना पटोले यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
प्रतीक्षा संपली, नागराजच्या ‘झुंड’च्या प्रदर्शनाची तारीख बिग बींकडून जाहीर
…तर अमिताभ बच्चन-अक्षयकुमारच्या सिनेमांचं शूटिंग-प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही : नाना पटोले
आमची सत्ता असताना इंधन दरवाढीवर टीव टीव करणारे अमिताभ, अक्षय गप्प का?; नाना पटोलेंचा सवाल
(Jhund Movie Amitabh Bachchan Vs Congress State President Nana Patole)