ठाणे : जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. शुक्रवारी जितेंद्र आव्हाड यांना अटक (Jitendra Awhad Arrest) करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना काल वैद्यकीय चाचणीसाठीही घेऊन जाण्यात आलं होतं. दरम्यान, शुक्रवारची रात्र जितेंद्र आव्हाड यांना पोलीस (Vartak Nagat Police) कोठडीतच काढावी लागलेली. आता आज कोर्टात जितेंद्र आव्हाड यांना दिलासा मिळतो की शनिवार आणि रविवारची रात्रही त्यांनी कोठडीतच काढावी लागते का, हे आज ठरणार आहे.
ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती. या अटकेनंतर राजकारण तापलंय. जितेंद्र आव्हाड यांना झालेल्या अटकेचा राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेच्या कारवाईविरोधात आज निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यभर आज जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचे पदसाद उमटण्याची शक्यता आहे.
वर्तक नगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली होती. हर हर महादेव चित्रपटाचा शो विवियाना मॉलमध्ये सुरु होता. हा शो बंद पाडताना जितेंद्र आव्हाड यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केली, असा आरोप करण्यात आलाय. या मारहाणीप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय.
आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 11, 2022
ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांसोबत अटकेआधी काय घडलं, हे देखील जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियात पोस्ट करत स्पष्ट केलं होतं. दरम्यान, आता कोर्टात जितेंद्र आव्हाड यांना हजर केल्यानंतर नेमकं काय घडलं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.