मुंबई : हनुमान चालिसा सोडून पेट्रोल – डिझेलवर (Petrol Diesel) बोलतायत हे नसे थोडके असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना लगावला आहे. राज्यसरकारने पेट्रोल- डिझेलवरील मुल्यवर्धीत करात कपात केल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टिका केली. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्यावर टीका केलीय. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. उशिरा का होईना पेट्रोल, डिझेल, गरीबांचे रोजगार याबद्दल त्यांना जाणीव होतेय, असा चिमटाही जितेंद्र आव्हाड यांनी काढला.
3 मे रोजी महाराष्ट्रात काय तरी होईल अशी व्यवस्था करण्यात आली. मात्र राज्यातील जनतेचे, या मातीचं कौतुक आहे. इथे महाराष्ट्र धर्म पाळला गेला. महाराष्ट्राची जी खरी ओळख आहे ती शिवरायांनी करुन दिली आहे, ती शाहू-फुले-आंबेडकरांनी पुढे जपली. इथे धर्मांधतेला मान्यता मिळत नाही. जातीयवाद इथे जास्त काळ टिकत नाही. यांची जी इच्छा होती, जो प्लॅन होता तो महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांनी उधळून लावला. महाराष्ट्र धर्म पाळला गेल्याचं आव्हाड म्हणाले.
सापळा कुणी लावला, कुणासाठी लावला, यामध्ये आम्ही पडत नाही. सापळा लागला की नाही लागला तो त्यांनी बघावं. सापळा लावला होता की नाही हे ही त्यांनी बघावं. यांच्या आणि त्यांच्या नात्यातील तो सापळा होता, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली. राजकारणात द्वेष असावा असं काही नसतं हा मॅच्युरिटीचा भाग आहे. लोकांमधील विश्वासार्हता चहा आणि जेवणाने कमी होत नाही. ती विश्वासाने मिळालेली असते ती सहजासहजी संपत नाही असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
ओबीसी आरक्षण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हातात असते तर मी त्यांच्या शेजारी ठाण मांडून करुन घेतले असते. ओबीसी आरक्षण हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तत्वांवर आधारित आहे. सर्वोच्च न्यायालयात हा विषय आहे त्यावर राजकारण करणे ही आपली प्रगल्भता नाही हे दर्शवते. प्रगल्भता असेल तर तुम्हाला मान्य करावं लागेल की हे सर्व सर्वोच्च न्यायालयात पेंडीग आहे. ज्या पद्धतीने बांठिया आयोग काम करतोय डाटा गोळा करतोय त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शंभर टक्के महाराष्ट्राच्या बाजुने लागेल व ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला.