मुंबई: विवियाना मॉल मारहाण प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. आव्हाड यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केल्याने आव्हाड यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉल मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली होती. आज दुपारी त्यांना ठाण्याच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे आव्हाड यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला होता.
त्यानंतर आव्हाड यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज दाखल केला. यावेळी आव्हाड यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. आव्हाड यांना लावण्यात आलेली 11 कलमं चुकीची आहेत. त्यातील कलम 7 तर ठाणे जिल्ह्यात लागत नसल्याचं वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर केला आहे. आव्हाड यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांना पोलिसांना तपास कामात सहकार्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी हर हर महादेव सिनेमाच्या विरोधात आंदोलन केलं होतं. विवियाना मॉलमध्ये हे आंदोलन करण्यात आलं होतं. आंदोलनावेळी प्रेक्षकांना मारहाण झाली होती. त्यामुळे वर्तकनगर पोलिसांनी आव्हाड यांना आधी ताब्यात घेऊन नंतर अटक केली होती.
आव्हाड यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी वर्तकनगर पोलीस स्टेशनबाहेर जोरदार आंदोलन केलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केलं. तसेच या घटनेचे राज्यभरातही पडसाद उमटले. सोलापुरात आव्हाड समर्थकांनी चक्का जाम केला होता. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आव्हाड यांच्या अटकेचा निषेध नोंदवला होता.