मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा (Molestation case) दाखल झाला आहे. त्यामुळे राजकारण ढवळून निघालंय. विनयभंगाचा गुन्हा नेमका कोणत्या कोणत्या कलमाखाली (IPC) दाखल होऊ शकतो? हा गुन्हा सिद्ध झाला, तर शिक्षा किती होते? या गुन्ह्यात जामीन मिळतो का? लगेच अटक होते का? असेही अनेक प्रश्न आता चर्चेत आले आहेत. यामुळे विनयभंगाचा गुन्हा म्हणजे नेमकं काय आणि या गुन्ह्यामध्ये कोणत्या कलमांखाली किती शिक्षेची तरतूद आहे, याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर 354 कलमाखाली विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी आता पुढील कारवाई केली जाते आहे.
महत्त्वाचं म्हणजे विनयभंग प्रकरणी फक्त 354च नव्हे तर अन्यही काही कलमांखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्याचे काही प्रकराही भारतीय दंड संहितेत नमूद करण्यात आलेले आहेत.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ?३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
भारतीय दंड संहितेत कलम 349 ते 358 हे विनयभंग गुन्ह्याशी संबंधित आहे. यातील 354 कलमाखाली जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विनयभंगाच्या प्रकारावरुन संबंधित कलम पोलिसांकडून संशयीत आरोपीवर लावलं जातं.
स्त्रियांचं विनयभंगापासून संरक्षण करण्याकरता या कलमांची तरतूद करण्यात आली होती. स्त्रियांच्या हितासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली होती.
समाजात स्त्रियांशी नैतिक आणि सभ्य वर्तन प्रत्येकानं करावं आणि तसं वर्तन जर केलं जात नसेल, तर अशांविरोधाचत स्त्रियांना दाद मागता यावी, यासाठी कायद्याची मदत घेतली जाते. मात्र या कलमांचा दुरुपयोगही केला जाऊ शकते, अशीबी भीती अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे.
विनयभंगाचा आरोप एखाद्या व्यक्तीवर करत पोलीस तक्रार केली गेली तर हा गुन्हा सिद्धही करावा लागतो. विशेष म्हणजे विनयभंगाचा प्रकरण न्यायालयाबाहेर सोडवता येऊ शकत नाही. दरम्यान, हा दखलपात्र आणि अजामीनपात्र स्वरुपाचा गुन्हा आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला 2 वर्षांची सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.
कलम 354 : एखाद्या स्त्रीला लाज वाटावी किंवा आक्षेपार्ह वाटावी अशा स्वरुपाची जबरदस्ती केल्यास कलम 354 अन्वये कारवाई केली जाऊ शकते. हा गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. शिवाय दंडही आकारला जाऊ शकतो. दुसऱ्यावेळी या गुन्ह्यात दोषी आढळल्यात शिक्षेत पाच वर्षांपर्यंत वाढही होऊ शकते.
कलम 349 : एखाद्या स्त्रीवर जबरदस्ती केली गेली, तर कलम 349 नुसार गुन्हा दाखल करता येऊ शकतो.
कलम 350 : गुन्हा करण्याच्या हेतून एखाद्या व्यक्तीने महिलेच्या परवानगीशिवाय तिच्यावर जबरदस्ती केली तर कलम 350 नुसार कारवाई केली जाऊ शकते.
कलम 351 : शब्दांसोबत शारीरिक हावभाव करत एखाद्या स्त्रिला लज्जा वाटावी, असं बोलणं किंवा कृती करणंही विनयभंग मानला जातो. त्यानुसार कलम 351 अन्वये कारवाई केली जाऊ शकते. वरील गुन्ह्यात 3 महिने कारावास आणि 100 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.
कलम 353 : सरकार कामात व्यत्यय आणण्यासाठी कलम 353 चा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
कलम 355 : एखाद्या व्यक्तीचा अपमान करण्याच्या हेतून हल्ला करणं किंवा धमकी देणं
कलम 365 : मालमत्तेच्या चोरीप्रकरणी हल्ला करणं किंवा धमकावणं
कलम 357 : एखाद्याला बंदी बनवणयासाठी चुकीचा प्रयत्न करताना हल्ला करणं
कलम 358 : धमकी देऊन प्राणघातक हल्ला करणं
भारतात अनेकही महिला विनयभंग झाल्यानंतरही तक्रार दाखल करत नाही, असं जाणकार सांगतात. बदनामी होईल, न्यायालयीन प्रक्रियेची संथ गती, इत्यादी कारणांमुळे अनेकदा विनयभंग प्रकरणी तक्रार दाखल केली जात नाही, असंही सांगितलं जातं. दरम्यान, विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर महिलेला आरोपीविरोधात गुन्हा सिद्ध करण्यासाठी साक्षीदार, पुरावे इत्याही महत्त्वपूर्ण गोष्टी कोर्टासमोर आणाव्या लागतात.