मुंबई : नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदार आशिष शेलार आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर तोफ डागली आहे. सोमय्यांना पक्षात काम उरलेलं नाही, तर शेलार रडल्यामुळे अमित शाहांनी त्यांना मंत्रिपद दिलं, अशा शब्दात आव्हाडांनी टीकास्त्र (Jitendra Awhad on BJP) सोडलं.
आशिष शेलार यांना फडणवीस सरकारच्या काळात शेवटी-शेवटी मंत्रिपद दिलं गेलं. तेसुद्धा शेलार खूप रडले म्हणून अमित शाहांनी त्यांना मंत्रिपद दिलं, अमित शाह नसते तर त्यांना देवेंद्रजीनी कधीच मंत्रिपद दिलं नसतं. त्यामुळे मी अमित शाहांवर बोलल्यामुळे शेलारांना माझ्यावर टीका करणं भाग होतं, असा घणाघात जितेंद्र आव्हाडांनी केला.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता जवाहरलाल नेहरु विद्यालयातील (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेला घाबरत आहेत. जेव्हा विचारसरणी किंवा बुद्धिमतेला सरकार घाबरतं तेव्हा देशात अराजकता येण्याची शक्यता असते’, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.
आव्हाडांच्या टीकेला उत्तर देताना, ‘जितेंद्र आव्हाड एक जबाबदार कॅबिनेट मंत्री झाले आहेत. तेव्हा आता केवळ आमदार असल्यासारखं वागू नका आणि या देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याविषयी सांभाळून बोला, अशी ताकीद आम्ही त्यांना देतोय’, असं आशिष शेलार म्हणाले होते.
मोदी-शाहांविरोधात बोलताना सांभाळून बोला; आशिष शेलारांची जितेंद्र आव्हाडांना ताकीद
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा पक्षाने वापर करुन घेतला. त्यांना आता फार कमी काम उरलं आहे. माझ्यावर काय कारवाई करणार? पोलिस मला फासावर चढवणार आहेत का? अशा शब्दात आव्हाडांनी सोमय्यांवरही टीकेची झोड उठवली.
‘फ्री काश्मीर’च्या घोषणा दिल्या जात असताना जितेंद्र आव्हाड तिथे उपस्थित होते, असा आरोप करत आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी किरीट सोमय्यांनी केली होती. जेएनयू हिंसाचाराविरोधात गेट वे ऑफ इंडियावर झालेल्या निदर्शनांना महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचा पाठिंबा होता, असा दावाही सोमय्यांनी केला.
नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील आझाद मैदानात ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर झळकवणाऱ्या तरुणीचं कौतुक केलं आहे. मेहक प्रभूचं काही चुकलं नसल्याचं आव्हाड म्हणाले.
मेहक प्रभू कोण मला माहित नाही, पण त्या मुलीचं कौतुक आहे. तिने जे सांगितलं ते बरोबरच आहे. आज काश्मीरचं जेल केलं आहे. पाच महिने लोकांना ना रोजगार आहे, ना कामधंदा. लोकांची खाण्यापिण्याची गैरसोय होत आहे. त्यांनी यातून ‘काश्मिरला फ्री करा’ म्हटलं, तर काय चुकलं? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना केला.
‘गोड बातमी’ वरुन भाजपमध्ये इतकी अस्वस्थता आहे, की ते सणवार शोधत आहेत. दसरा-दिवाळी काहीतरी होईल. पण काही होणार नाही. इतकी रडणारी पोरं पहिली नाहीत. सत्ता आज आहे, उद्या नाही, त्यासाठी इतकं काय रडायचं? असा टोलाही आव्हाडांनी लगावला.
Jitendra Awhad on BJP