आधी अक्षयकुमार, आता महानायकाच्या जुन्या ट्वीटचे आव्हाडांकडून ‘उत्खनन’

| Updated on: Jun 26, 2020 | 10:43 AM

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा गगनाला भिडले आहेत. मुंबईकरांनी आता कार जाळावी की चालवावी?" असा सवाल आव्हाडांनी अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटला 'कोट-रीट्वीट' करत विचारला आहे. (Jitendra Awhad questions Amitabh Bachchan for not commenting on Petrol Diesel Price hike)

आधी अक्षयकुमार, आता महानायकाच्या जुन्या ट्वीटचे आव्हाडांकडून उत्खनन
Follow us on

मुंबई : इंधन दरवाढीबाबत 9 वर्षांपूर्वी केलेल्या ट्वीटवरुन अभिनेता अक्षयकुमारला कानपिचक्या लगावल्यानंतर गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना सवाल केले आहेत. पेट्रोलच्या किमतीबाबत बिग बींनी आठ वर्षांपूर्वी केलेल्या ट्वीटवरुन आव्हाडांनी निशाणा साधला. (Jitendra Awhad questions Amitabh Bachchan for not commenting on Petrol Diesel Price hike)

24 मे 2012 रोजी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केले होते. “पेट्रोल साडेसात रुपयांनी महाग, पम्प अटेंडंट विचारतो ‘कितीचे टाकू?’ मुंबईकर म्हणतात – दोन-चार रुपयाचे वरुन स्प्रे कर भावा, जाळायची आहे.” अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले होते.

“तुम्ही पेट्रोल पंपावर इंधन भरले नाही की तुम्ही बिलाकडे पाहत नाही? आता तुम्ही बोलण्याची वेळ आली आहे. मी आशा करतो तुम्ही पक्षपाती नसाल. पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा गगनाला भिडले आहेत. मुंबईकरांनी आता कार जाळावी की चालवावी?” असा सवाल आव्हाडांनी अमिताभ बच्चन यांच्या जुन्या ट्वीटला ‘कोट-रीट्वीट’ करत विचारला आहे.

अक्षयकुमारच्या 9 वर्ष जुन्या ट्वीटवरुन आव्हाडांचे शालजोडे

“मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण इंधनाच्या किमती पुन्हा रॉकेटप्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती.” असे ट्वीट अक्षयकुमारने 16 मे 2011 रोजी केले होते.

इथे वाचा मूळ बातमी : गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर? अक्षयकुमारच्या 9 वर्ष जुन्या ट्वीटवरुन आव्हाडांचे शालजोडे

अक्षयचे 9 वर्ष जुने ट्वीट अक्षरशः खणून काढत जितेंद्र आव्हाडां ‘कोट-रीट्वीट’ केले आहे. “तू ट्विटरवर अ‍ॅक्टिव्ह नाहीस का? तू गाड्या वापरणं बंद केलंस का? तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का? तुझ्या माहितीसाठी सांगतो, प्रचंड मोठी पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली आहे” असे ट्वीट करत आव्हाडांनी अक्षयकुमारला मेन्शनही केले.

2011-2012 मध्ये केंद्रात यूपीए-2 अर्थात काँग्रेसप्रणित मनमोहन सिंह सरकार होते, तर महाराष्ट्रातही पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. आता मोदी सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा गगनाला भिडले असताना अक्षयकुमार आणि अमिताभ बच्चन यांनी मौन साधल्याने जितेंद्र आव्हाडांनी डिवचले. आता अक्षयकुमार किंवा अमिताभ बच्चन आव्हाडांना उत्तर देतात का, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

इंधनाच्या किमतीत सलग 20 व्या दिवशी दरवाढ सुरुच आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतींचा आजही भडका उडाला आहे. डिझेल 17 पैशांनी तर पेट्रोल 21 पैशांनी महाग झालं. गेल्या वीस दिवसात पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 8.87 रुपयांनी, तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 10.8 रुपयांनी वधारली आहे. (Jitendra Awhad questions Amitabh Bachchan for not commenting on Petrol Diesel Price hike)