ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) फेसबुक पोस्टनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. पवार समर्थक, राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून केतकी चितळेवर सडकून टीका होतेय. अशावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही केतकीच्या पोस्टचा चांगलाच समाचार घेतलाय. आव्हाड म्हणाले की राजकीय टीकेचा राजकीय मुकाबला होऊ शकतो. राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील हे देखील टीका करतात. त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. ही वैचारिक लढाई असते, ती आम्ही विचारानेच लढतो. मात्र, ‘पवारांच्या आजाराबाबत, त्यांच्या शारिरिक स्थितीबाबत बोलणं, नरक मिळावा म्हणून प्रार्थना करणं हे एका स्त्रीला शोभा देत नाही’, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.
पवारसाहेबांवर अनेकवेळा टीका झाली. तेव्हा आम्ही बोललो. मात्र शरद पवार यांच्या आजाराबाबत, त्यांच्या शारिरिक स्थितीबाबत बोलणं आणि नरक मिळावा अशी प्रार्थना करणं, हे एका स्त्रीला शोभण्यासारखं नाही. स्त्री ही मातेसमान असते. पवारांबाबत जे भयंकर लिहिलं आहे, ते शब्द तोंडातून निघतही नाहीत. असं का लिहावं वाटतं हा संशोधनाचा विषय आहे. इतिहासात भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांवरही टीका केली होती. आम्ही पहिल्याच फटक्यात गांभीर्यानं घेत नाही. लोक मला सांगत आहेत की कशाला गांभीर्यानं घेता. वयाच्या 83 व्या वर्षी मैदानात उतरणारा तुमचा बाप, त्याच्यावर चालून जाणारी विकृती कुणी असेल तर त्यांना रोखायला हवं. नाहीतर अशी वाढत जाणारी विषवल्ली जोपर्यंत ठेचून काढत नाही तोपर्यंत विषवल्ली वाढतच जाणार. त्यामुळे हे विष संपवलं नाही तर ते समाजाला संपवून टाकेल, असा सूचक इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय.