मुंबई : राष्ट्रवादीतील गळतीमुळे पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) ‘जखमी’ झाले आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या पाच दिग्गज नेत्यांची गेल्या आठवड्याभरात भाजपमध्ये ‘मेगाभरती’ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.
मधुकर पिचड यांच्याकडून अपेक्षा नव्हती. पुरोगामी महाराष्ट्राची वाच्यता करणारे जातीयवाद्यांच्या कळपात जाऊन बसले आहेत. मात्र शिवेंद्रराजेंबद्दल आश्चर्य वाटतं. छत्रपतींचे वारसदार असूनही त्यांच्यामध्ये लढण्याची जिद्द नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाण्यामागे सत्तेची लाचारी हे कारण आहे. यांच्यामध्ये वैचारिक अधिष्ठान राहिलेलं नाही. मात्र वैचारिक संघर्षाची लढाई दोन-चार जण इथे तिथे गेले तर संपत नाही, असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.
भाजपने चिन्हं बदलावं
भाजप आता 50 टक्के काँग्रेसमय झाली आहे. त्यामुळे भाजपने आपलं चिन्ह बदलून ‘कमळावर घड्याळ आणि हात’ असं ठेवावं, असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी लगावला. भाजपची बिर्याणी झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनाही मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पडलं आहे, अशा शब्दात आव्हाडांनी पाटलांवर टीका केली.
आता तीन आले आहेत. निवडणूक अजून बाकी आहे, अजून येतील. शरद पवारांनी तीन गेलेत त्याचा धसका घेतला आहे. अजून जातील, याची मानसिकता ठेवावी, असा सूचक इशारा काल चंद्रकांत पाटलांनी दिला होता.
दरम्यान, सध्या भाजपची मग्रुरी दिसत आहे. मात्र जनता आमच्या ताब्यात आहे, असा विश्वास जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला. देश आर्थिक परिस्थितीशी झुंजत आहे. वेळीच सावरलं नाही तर सीरियाच्या मार्गावर जाईल, अशी भीतीही आव्हाडांनी बोलून दाखवली.
शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle), मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.