मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वागत केलंय. शिवाय पवार साहेबांच्या सामाजिक विचारांशी बांधिलकी असणारा म्हणून मला वाटायचे की, पवार साहेबांनी लोकसभा निवडणूक लढवू नये, अशी प्रतिक्रियाही जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.
शरद पवार यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही वेळातच जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं. “पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता या नात्याने तसेच साहेबांच्या सामाजिक विचारांशी बांधिलकी असणारा म्हणून मला वाटायचे कि, पवार साहेबांनी लोकसभा निवडणूक लढवू नये. त्यांनी यापूर्वीच जाहीर केल होत की, मी सार्वजनिक निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे त्यांच्यानिर्णयाच मी मनापासून स्वागत करतो”, असं ट्वीट त्यांनी केलं.
मी स्वत: लोकसभा निवडणूक न लढता नव्या पिढीला उमेदवारी देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आणि सोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देणार असल्याचीही घोषणा केली. मात्र, पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांनी दोन निकष सांगितले.
पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्याबाबत शरद पवार म्हणाले, “आमच्या कुटुंबीयांमधील सुप्रिया सुळे उमेदवारी करणार आहेत, तर पार्थ पवार यांच्या उमेदवारीसंदर्भात शेकापचे जयंत पाटील यांनी त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवाराला संधी द्यावी, असा विचार आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणूक न लढता नव्या पिढीला पार्थला उमेदवारी देण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही आलो आहोत.”
काय म्हणाले शरद पवार?