मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) आता महाराष्ट्रातील काही महापालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका, ग्रामपंचायत अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) होणार आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जाऊ लागला होता. मात्र, तो जोर धरताना दिसून आला नाही. अशावेळी ईव्हीएम की बॅलेट पेपर (ballot paper) असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केलीय.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून बॅलेट पेपरचा मुद्दा उपस्थित केलाय. ‘अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेतल्या. तो राज्याचा निर्णय असतो. महाराष्ट्रानेही येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’, अशी मागणी आव्हाड यांनी केलीय.
अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ह्या ballot paper वर घेतल्या तो राज्याचा निर्णय असतो
महाराष्ट्रानी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका #BallotPaper वर घ्यावी @OfficeofUT @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @NANA_PATOLE #NoEVM— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 13, 2022
कर्नाटकमध्ये ज्या प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या. त्याचप्रमाणे राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत शंका-कुशंका आहेत. त्यामुळे प्रयोग म्हणून तरी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी आपली मागणी आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडणार असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
ईव्हीएम मशीनवर निवडणुका घेण्यास सुरुवात झाल्यापासून अनेकदा त्यावर आक्षेप घेण्यात आले. ईव्हीएममध्ये फेरफार करुन एकाच पक्षाकडे मतं वळवली जात असल्याचा आरोप अनेकदा झाला. त्यावेळी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणीही अनेकदा करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं आवाहन दिलं होतं. महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून पुन्हा निवडणुका घ्या, या भारतीय जनता पक्षाच्या आव्हानाला काँग्रेसनेही प्रतिआव्हान दिलेय. भाजपमध्ये हिंमत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करून बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, असे प्रतिआव्हान पटोले यांनी दिलं होतं.
‘ईव्हीएम’ अर्थातच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन. पारपंरिक मतदानाची पद्धत मतपेट्या कालबाह्य होऊन मतदान आणि मतमोजणीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) या आधुनिक उपकरणाचा वापर करण्यात येतो. ‘ईव्हीएम’चे मुख्यत्वे बॅलेट युनिट (BU), कंट्रोल युनिट (CU ), व्होटर व्हेरिफाइबल पेपर ऑडिट ट्रेल मशीन (VVPAT) असे तीन भाग असतात. मतदान अधिक पारदर्शी करण्यासाठी 2010 नंतर ‘व्हीव्हीपॅट’चा वापर करण्यास सुरूवात झाली आहे.
इतर बातम्या :