मुंबई : एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यासारख्या मंत्र्यांना तिकीट न देण्यामागील भाजपची भूमिका कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा (Nadda on Eknath Khadse Prakash Mehta) यांनी स्पष्ट केली आहे. भ्रष्टाचाराबाबत शून्य सहिष्णुतेमुळे खडसे-मेहतांसारख्या मंत्र्यांना घरी बसवल्याचं नड्डा यांनी मान्य केलं.
विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने पहिली यादी जाहीर करतानाच खडसे, मेहता यांच्यासह विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव वगळल्याने चर्चेला तोंड फुटलं होतं. चारही याद्यांमध्ये चौघा मंत्र्यांना स्थान न मिळाल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याचं निश्चित झालं.
भाजपचं संकल्पपत्र जाहीर करण्यासाठी मुंबईत आलेले भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. खडसे, मेहता यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मग तुम्ही भ्रष्टाचारमुक्त किंवा स्वच्छ सरकारच्या गमजा कशा मारता? असा प्रश्न नड्डा यांना विचारण्यात आला.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि सावरकरांना ‘भारतरत्न’साठी प्रयत्न, भाजपचं संकल्पपत्र
‘भाजप आणि सरकारची भ्रष्टाचाराकडे पाहण्याची दृष्टीच यातून दिसून येते. भ्रष्टाचाराबाबत असलेल्या झिरो टॉलरन्समुळेच दोघा मंत्र्यांना कॅबिनेटमधून बाहेरचा रस्ता दाखवला आणि तिकीट नाकारलं, हे सरकारच्या भ्रष्टाचाराप्रती असलेल्या भूमिकेचं प्रतीक आहे.’ याकडे नड्डा (Nadda on Eknath Khadse Prakash Mehta) यांनी लक्ष वेधलं.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या विजयकुमार गावित, बबन पाचपुते आणि विजयसिंह पाटील यांना पक्षात कसा प्रवेश दिला असा प्रश्न जोडून विचारण्यात आला. त्यावरही भ्रष्टाचाराबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आणि त्यावरच मार्गक्रमण सुरु राहील, असं नड्डा यांनी सांगितलं.
एमआयडीसी कथित जमिन व्यवहार घोटाळ्यात नाव आल्यानंतर एकनाथ खडसे यांना महसूलमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर एसआरए घोटाळ्याचे आरोप झाल्यामुळे प्रकाश मेहता यांना मंत्रिमंडळ फेरबदलात वगळण्यात आलं होतं.
जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपने आपला जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी मंगलप्रभात लोढा, विनोद तावडेही उपस्थित होते.
जे. पी. नड्डा यांना विचारलेला प्रश्न पाहा 59 मिनिटं 08 सेकंदांपासून पुढे