हैदराबाद : देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणत काँग्रेसकडून महाआघाडी बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध राज्यातील भाजपविरोधी पक्षांना यामध्ये एकत्र आणलं जात आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी घेतली आहे. पण महाआघाडीचा खेळ बिघडेल, अशी एक तिसरी आघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जातंय. ना काँग्रेस, ना भाजप असं त्यांचं मत आहे. यासाठी ते ओदिशाचा सत्ताधारी पक्ष बीजेडी म्हणजेच बिजू जनता दल आणि पश्चिम बंगालचा सत्ताधारी पक्ष तृणमुल काँग्रेसला सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेटही घेतली आहे.
ओदिशामध्ये बीजेडीचं मोठं वजन आहे. के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली, तर सोमवारी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली. सपा आणि बसपाचे प्रमुख अनुक्रमे अखिलेश यादव आणि मायावती यांचीही भेट ते घेणार आहेत. वाचा – राहुल गांधींचं नेतृत्त्व पवारांनाही मान्य, विरोधकांची मोट बांधण्याचा विडा उचलला
केसीआर यांनी या तिसऱ्या आघाडीबाबत सूचक संकेत दिले आहेत. आमची चर्चा सुरु आहे. लवकरच एका प्लॅनसह समोर येऊ. यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी कोलकात्यात ममतांची भेट घेतल्यानंतर दिली. त्यामुळे आता ही तिसरी आघाडी महाआघाडीत बिघाडी करण्याची शक्यता आहे.
देशातलं सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशमध्ये 80 मतदारसंघ आहेत. या राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्ष सपा आणि बसपाने काँग्रेसशी जवळीक न साधता एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही पक्षांच्या मतांचं विभाजन टाळल्यास काय होऊ शकतं याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वीच गोरखपूर (यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा लोकसभा मतदारसंघ) पोटनिवडणुकीत आला होता. सपा आणि बसपाने एकत्र येत भाजपचा दारुण पराभव केला होता.