ठाणे : कल्याण लोकसभेसाठी आज शिवसेना-भाजप-रिपाइं युतीकडून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या मालमत्तेत मागील 5 वर्षात तब्बल 10 पटीने वाढ झाली आहे.
2014 ला उमेदवारी अर्ज दाखल करताना श्रीकांत शिंदे यांच्या खात्यात 9 लाख 98 हजार रुपये जमा होते. मात्र, मागील 5 वर्षात त्यांची मालमत्ता 91 लाख 13 हजार रुपयांवर पोहचली आहे. याखेरीज त्यांनी स्व-कमाईतून महाबळेश्वर येथे जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीची किंमत 55 लाख रुपये एवढी आहे. तसेच त्यांच्या पत्नीकडे 50 लाख रुपयांची मालमत्ता असून 12 लाख 41 हजार रुपयांचे कर्ज आहे.
दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांची एकूण स्थावर मालमत्ता 10 कोटी 57 लाख एवढी आहे. त्यांच्याकडे 10 लाख रुपये रोख रक्कम, 96 लाखांचे दागिने आणि दिमतीला 4 चारचाकी गाड्या अशी संपत्ती आहे. व्यावसायिक असलेल्या पाटील यांच्यावर 35 लाख रुपयांचे कर्ज असल्याचेही त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. मात्र, इतर अपक्ष उमेदवार संपत्तीच्या बाबतीत या 2 उमेदवारांच्या जवळपासही नसल्याचे दिसत आहे.
पाहा व्हिडीओ: