भोपाळ: भाजपच्या महिला नेत्या इमरती देवी यांचा आक्षेपार्ह शब्दात उल्लेख केल्यानं वादात सापडलेले माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. माझं व्यक्तव्य कुणाला आक्षेपार्ह वाटलं असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचं कमलनाथ म्हणाले. मात्र कमलनाथ यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी राष्ट्रीय महिला आयोगानं त्यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. (Kamalnath’s apology for objectionable statement on Imratidevi)
राष्ट्रीय महिला आयोग मध्यप्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी केलेल्या अपमानास्पद आणि बेजबाबदार वक्तव्याची निंदा केली आहे. कमलनाथ यांच्याकडून आक्षेपार्ह वक्तव्याबाबत स्पष्टीकरणही मागितलं आहे. तसंच NWCने निवडणूक आयोगाला याबाबत कारवाई करण्याची सूचनाही केल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
दुसरीकडे कमलनाथ यांनी आपल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करताना भाजपवर टीका केली आहे. ‘भाजपला आपल्या पराभवाची जाणीव झाली आहे. त्यामुळेच मूळ मुद्द्यांपासून जनतेला भरकटवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना जे काही बोलायचं ते बोलू देत, आपण त्यांना यश मिळवू देणार नाही’, असं कमलनाथ म्हणाले.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी जाहीर सभेत भाजपच्या मंत्री इमरती देवी यांचा ‘आयटम’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं. दरम्यान, कमलनाथ यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करुन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या यादीवर आइटम नंबर 1 , आइटम नंबर 2 असे उल्लेख असतात. त्यामुळे मी आइटम हा शब्द वाईट हेतूने किंवा अपमान करण्याच्या हेतूने वापरला नव्हता. या शब्दात काहीही वावगे नाही. सभेतील भाषणावेळी मला आमदार इमरती देवी यांचे नाव आठवत नव्हते. त्यामुळे मी त्यांचा उल्लेख ‘येथील जो आइटम आहे’, असा केल्याचं स्पष्टीकरण कमलनाथ यांनी दिलं होतं.
“एका गरीब आणि मजुर कुटुंबातून पुढे आलेल्या दलित नेत्या इमरती देवी यांच्यासाठी डबरा येथे आयटम आणि जलेबी असे अत्यंत निंदास्पद आणि आक्षेपार्ह शब्दप्रयोग झाले. यातून कमलनाथ यांची मानसिकता दिसते. महिलांसह संपूर्ण दलित समाजाचा अपमान करणाऱ्या या अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे.” अशा शब्दात भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
‘अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ’, ज्योतिरादित्य शिंदे यांचा कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल
Kamalnath’s apology for objectionable statement on Imratidevi