कराड: काँग्रेस पक्षात राहून कट्टर विरोधक असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांची अखेर दिलजमाई झाली आहे. चार दिवसांपूर्वीच हे दोन्ही नेते एका कार्यक्रमात भेटले होते. तेव्हा दोघांनी हस्तांदोलन करत आपल्यातील वैर संपल्याचं दाखवून दिलं होतं. त्यानंतर आज विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह उंडाळकर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. ( Karad Udaysingh Undalkar will join the congress today )
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उदयसिंह उंडाळकर यांचा कांग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशानिमित्त पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका उंडाळकर प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहेत. चव्हाण आणि उंडाळकर यांची दिलजमाई झाल्यानंतर उदयसिंह उंडाळकर आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचं काम करणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उदयसिंह यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील यांची मुंबईत नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये उदयसिंह पाटील यांना कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय समितीत सक्रिय करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे.
काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलास उंडाळकर यांची त्यांच्या सातारा येथील राजविलास या बंगल्यात जाऊन भेट घेतली. त्यामुळे त्यांच्यामधला टोकाच्या संघर्षाचा आता अंत झाला असल्याची चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यातील आता दरी कमी झाली आहे.
कराड दक्षिण मतदार संघाने आत्तापर्यंत तीनच विधासभेचे आमदार पाहिले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. पहिल्यांदा जेष्ठ नेते यशवंतराव मोहिते यांनी कराड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर तब्बल सात टर्म म्हणजेच सलग 35 वर्षे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे कराड दक्षिणचे आमदार राहिले. त्यानंतर त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवली. त्यामध्ये चव्हाण विजयी होऊन ते कराड दक्षिणचे आमदार झाले. अशा प्रकारे कराड दक्षिण मतदारसंघाने आत्तापर्यंत तीनच आमदार पाहिले आहेत.
कट्टर विरोधक एकत्र, पृथ्वीबाबा-विलासकाका उंडाळकर यांची दिलजमाई, सातारा काँग्रेसची ताकद वाढणार
साताऱ्यात निवडून यायला पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते : सामना
Karad Udaysingh Undalkar will join the congress today