अहमदनगर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे (Local Body Elections) बिगूल वाजले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीसाठी (Karjat Nagar Panchayat) दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) तर दुसरीकडे भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) असा असा सामना रंगणार आहे. 21 डिसेंबर रोजी कर्जत नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. कर्जत नगरपंचायतीवर सध्या भाजपची एक हाती सत्ता आहे. ही सत्ता राखण्यासाठी शिंदेंनी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर रोहित पवार यांनी भाजपचा गड भेदण्यासाठी जोरदार रणनिती आखल्याचं पाहायला मिळत आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव करुन मोठा धक्का देत भाजपच्या बालेकिल्लात प्रवेश केला. मात्र, आता रोहित पवारांची खरी कसोटी नगरपंचायतीच्या निवडणुकीत लागणार आहे. रोहित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. तर शिंदे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते सर्व ताकद लावून कामाला लागले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत विजय आमचाच होणार, नगर पंचायतीच्या 17 पैकी 17 जागा आम्हीच जिंकणार, असा दावा रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसंच राजकिय हित आणि राजकारण करणाऱ्या लोकांच्या मागे लोक कधीही उभे राहत नाहीत, असा टोलाही त्यांनी शिंदे यांना लगावला आहे.
दुसरीकडे राम शिंदे हे मागील 10 वर्ष या मतदारसंघाचे आमदार होते. तसेच भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होतेय. या काळात मतदारसंघात मी अनेक विकासाची कामे केली. मात्र, मागील दोन वर्षांपासून कुठलंही काम या मतदारसंघात झालं नाही, अशी टीका शिंदे यांनी रोहित पवारांवर केलीय. तसेच आपण केलेल्या कामाच्या जोरावर आणि लोकांच्या विश्वासावर जनता भाजपला बहुमत दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केलाय.
भाजप :12
राष्ट्रवादी : 0
काँग्रेस : 4
शिवसेना : 0
अपक्ष : 1
एकूण सदस्य संख्या : 17
मागील नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं खातही उघडलं नव्हतं. मात्र, ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी निवडणुकीपूर्वीच रोहित पवारांनी मोठी खेळी खेळलीये. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांना फोडून राष्ट्रवादीच्या गोटात शामिल केलं आहे. कर्जत नगरपंचायत निवडणूकही नामदेव राऊत यांच्या भोवती फिरते. कारण, मागील 25 वर्षंपासून राऊत यांचंच कर्जत शहरावर मोठं वर्चस्व आहेय. त्यामुळे राऊत यांना राष्ट्रवादीत शामिल करून घेतल्याशिवाय ही निवडणूक रोहित पवारांसाठी सोपी नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत राऊत यांची महत्वाची भूमिका असणार आहे. काही दिवसांपूर्वी राऊत भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झाले. तर दोन वर्षात रोहित पवारांच्या कामाचा वेग पाहता विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक गाजणार आहे. रोहित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय.
इतर बातम्या :