मोठी बातमी | भाजप आमदार पुत्राच्या घरी नोटांचं घबाड, तब्बल 6 कोटींची रोकड Video, काल लाच घेताना अटक

| Updated on: Mar 03, 2023 | 1:56 PM

लाच घेताना पकडलेल्या भाजप आमदार पुत्राच्या घरी आज लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी धाड टाकली. यावेळी घरात 6 कोटी रुपयांची रोकड आढळून आली.

मोठी बातमी | भाजप आमदार पुत्राच्या घरी नोटांचं घबाड, तब्बल 6 कोटींची रोकड Video, काल लाच घेताना अटक
Image Credit source: social media
Follow us on

भाजप आमदाराच्या (BJP MLA) ज्या मुलाला काल लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं, त्याच मुलाच्या घरी आज अधिकाऱ्यांनी धाड टाकली. या छापेमारीत आमदारपुत्राच्या घरी नोटांचं घबाड आढळून आलंय. कर्नाटक भाजपाचे आमदार एम विरुपक्षप्पा यांचे पुत्र प्रशांत (Prashant) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली. विशेष म्हणजे ही लाच स्वीकारण्याचं काम थेट आमदारांच्या कार्यालयातच चालू होतं. ही लाच आमदारांसाठीच स्वीकारली जात असल्याचाही दावा केला जातोय. लोकायुक्तांच्या भ्रष्टाचार विरोधी शाखेने काल त्यांना ४० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर प्रशांत यांच्या घरी धाड टाकण्यात आली. तिथे ६ कोटी रुपयांची रोकड आढळली. प्रशांत यांच्या घरी सापडलेल्या नोटांच्या ढिगाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफ्फान व्हायरल होत आहेत. कर्नाटकात येत्या वर्षभरात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदारपुत्राच्या घरी एवढी रक्कम सापडल्याने भाजपच्या अडचणींत वाढ झाली आहे.

कोण आहेत हे आमदार पुत्र?

कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी येथील भाजप आमदार के मडल विरुपक्षप्पा यांचे पुत्र व्ही प्रशांत मडल यांना लोकायुक्त पोलिसांनी अटक केली आहे. एम विरुपक्षप्पा हे राज्यातील सरकारी कंपनी कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेडचे अध्यक्षही आहेत. हीच कंपनी प्रसिद्ध म्हैसूर सँडल सोप बनवते. तर विरुपक्षप्पा यांचे पुत्र प्रशांत हे बंगळुरू सिंचन मंडळावर चीफ अकाउंटंट म्हणून काम करतात. गुरुवारी लोकायुक्त पोलिसांनी प्रशांत यांना केएसडीएलच्या ऑफिसमध्ये 40 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली.

ऑफिसमध्ये 1.75  कोटी रुपये

प्रशांत यांना काल लोकायुक्त पोलिसांनी लाच घेताना पकडलं. त्यानंतर त्यांच्या ऑफिसची झडती घेण्यात आली. या ठिकाणी 1.75 कोटी रुपयांची रोकड आढळली. त्यानंतर आज प्रशांत यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. येथे नोटांचा खजिना आढळला. अधिकाऱ्यांना ही रक्कम मोजण्यासाठी अनेक तास लागले. त्याचेच फोटो सध्या सोशल मीडियाववर व्हायरल होत आहेत.

मुख्यमंत्री बोम्मई काय म्हणाले?

कर्नाटक राज्यात सध्या भाजपचं सरकार आहे. भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली जाईल. लोकायुक्त व्यवस्था स्वतंत्र प्रणाली आहे. काँग्रेसच्या काळात तर लोकायुक्त प्रणाली नष्ट करण्यात आली होती. त्यामुळे अनेक केस बंद करण्यात आल्या होत्या. आम्ही त्या केसचीही चौकशी करणार आहोत. लोकायुक्त पोलिसांना या प्रकरणातही चौकशीचे अधिकार आहेत, हीच आमची भूमिका आहे.