भूषण पाटील, सांगलीः कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी बंगळुरू येथे एक खळबळजनक वक्तव्य केलंय. सांगली जिल्ह्यातील (Sangli District) जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. या मुद्द्यावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
एका बाजूला कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकार सकारात्मक आहे. उच्च स्तरीय समितीची बैठक होत असतानाच कर्नाटक सरकार मात्र या सर्व घडामोडींना खो देण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आणखी तापण्याची चिन्हं आहेत.
सांगलीतील जत तालुक्यातील 40 गावांना नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो. मात्र काही वर्षांपूर्वी येथील गावांनी एक ठराव केला होता. त्याचा दाखला बसवराज बोम्मई यांनी दिलाय.
महाराष्ट्र आणि कर्नाटकांच्या राज्यपालांदरम्यान समन्वय साधण्यासाठी बैठक झाली होती. एका बाजूला हे सकारात्मक प्रयत्न सुरु असताना कर्नाटक सरकारकडून हा वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना जत तालुक्यातल्या या ग्रामपंचायतींनी सुविधा मिळत नसल्याने कर्नाटक राज्यात समावेश करा, असा प्रस्ताव मांडला होता आणि तो मंजूर करण्यात आला होता, असा दावा बोम्मई यांनी केला आहे. या ठरावांचा कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचं बोम्मई म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर नुकतीच एक बैठक झाली. सीमेवरील नागरिकांच्या पाठिशी राज्य सरकार असून कायदेशीर लढाई लढली जाईल. यातील न्यायप्रक्रियेच्या समन्वयासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देईस या दोन मंत्र्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय भूमिका असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.