दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, मुंबई : कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत आहे. याचा देशाला आनंद झाला. कर्नाटकातला निकालाचा परिणाम हा २०२४ ला दिल्लीतील दरवाजा कुणासाठी उघडला जाईल, याचा जनमाणस आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली. संजय राऊत म्हणाले, आज दोन निकाल लागले. उत्तर प्रदेशात नगर परिषदा आणि पंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात भाजपला मोठं यश मिळतंय. ते पूर्णपणे योगी आदित्यनाथ यांचे यश आहे. त्यात काही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नाहीत. योगी यांचे एकहाती यश आहे. पण, कर्नाटकामधला काँग्रेसचा विजय हा मोदी आणि शाह यांचा दारुण पराभव आहे. कारण या निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तंबू ठोकला होता.
देशाचे पंतप्रधान मोदी आहेत. मणीपूरमध्ये हिंसाचार उसळला. मणीपूर पेटला. जम्मू्च्या पुंछमध्ये पाच जवानांच्या हत्या झाल्या. ठिकठिकाणी दहशतवादी हल्ले होत आहेत. अशावेळी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि इतर केंद्रीय मंत्री हे कर्नाटकात भाजपच्या विजयासाठी तळ ठोकून बसले होते. भाजपशासित राज्या-राज्यांचे मुख्यमंत्री तिथं येऊन थांबले. तरीही कर्नाटकात भाजपचा पराभव झाला असल्याचं संजय राऊत यांनी म्हंटलं.
भाजपने दिग्गज लोकं उतरवले होते. पण, कर्नाटकात काँग्रेस एकसंघ होते. सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार यांनी आपल्या आकांशा बाजूला ठेवून काँग्रेसच्या प्रचारात स्वतःला झोकून दिलं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे असोत की, काँग्रेसचे कार्यकर्ते उन्हातानात प्रचारासाठी फिरले. कर्नाटकत्या लोकांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना स्वीकारलं.
राहुल गांधी यांची खासदारकी घालवली. त्यांच घर काढून घेतलं. राहुल गांधी यांना दिलासा देण्यासाठी गुजरातचे कोर्ट तयार नाही. याचा परिणाम झालेला कर्नाटकमध्ये दिसतो. तुम्ही अन्याय करत असले, तरी जनात न्याय करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा स्वतःचा व्यक्तिगत पराभव मानायला पाहिजे. अमित शाह यांनी स्वतःचा व्यक्तिगत पराभव मानायला पाहिजे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
अमित शाह म्हणाले, भाजप जिंकला नाही, तर करा दंगली. नरेंद्र मोदी यांना वाटलं मी स्वतः हरतोय. त्यांनी बजरंग बलीची गदा आणली. पण, बजरंग बली यांनी विजयाची गदा काँग्रेसच्या खांद्यावर ठेवली. हिजाब चालला नाही. बजरंग बली चालला नाही, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.