महेंद्रकुमार मुधोळकर, बीड : कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Chinchwad) पोट निवडणुकीचा (BY Election) प्रचार शिगेला पोहोचला आहे. आज महाविकास आघाडीविरोधात भाजप नेत्यांच्या दिग्गज सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या प्रचार सभांवरून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना जाणूबुजून कसबा तसेच चिंचवड पोट निवडणुकांपासून दूर ठेवलं जातंय का, असा सवाल भाजप नेत्याने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल मिटकरी यांना केवळ स्टार प्रचारक म्हणून नेमलंय, पण त्यांची सभा का घेत नाहीत… राष्ट्रवादी काँग्रेसला कशाची भीती वाटतेय, असा सवाल भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केलाय.
भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी बीडमध्ये माध्यमांशी बोलताना हा सवाल उपस्थित केलाय. ते म्हणाले, राष्ट्रवादीला सवाल आहे. कसब्यात प्रचारात तुम्ही वाचाळ वीर अमोल मिटकरीला बाहेर का ठेवलंय… ज्यानं सतत ब्राह्मणाच्या विरोधात गरळ ओतली. जे मिटकरी सतत ब्राह्मणांचा द्वेष करतात.त्याला प्रचारात पाठवा. त्यांना केवळ स्टार प्रचारक म्हणून ठेवलंय. अजूनही त्याची सभा होत नाही. मिटकरींना पाठवलं तर याचे परिणाम भोगावे लागतील.. अशी खोचक टीकाही राम कुलकर्णी यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता या टीकेला कशा प्रकारे उत्तर देणार,याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तिकिट दिलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना मैदानात उतरवलंय. या ठिकाणी शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. ते अपक्ष म्हणून उभे आहेत. तर कसब्यातून भाजपने हेमंत रासणे यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं आहे. तसेच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना कसब्यातून उमेदवारी देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही नुकतीच प्रचार सभा घेतली. राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांचीही आज प्रचार सभा आहे. या सभेत नेते एकमेकांवर कशा प्रकारे टीका-टिप्पणी करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.