कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात वक्तव्य केलं आहे. जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत मात्र एकत्र पॅनल व्हावं अशी आमची इच्छा होती. मात्र, काही राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेल्या लोकांमुळे ही निवडणूक लागली असल्याची टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे. मतदारांना ही निवडणूक नको होती, असं देखील ते म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला डावलण्याचा प्रश्नच नाही. सर्वच ठिकाणी शिवसेनेला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील समीकरण वेगळी झाल्याने शिवसेना बाजूला गेली. इतर निवडणुकामध्ये शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी चुरशीने मतदान पार पडत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत 4079 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बारापर्यंत 53. 31 टक्के मतदान पूर्ण झाले. दुपारी बारा वाजेपर्यंत आजरा नंतर गगनबावडा मतदान केंद्रावरील मतदान जवळपास पूर्ण झाले होते. शिरोळ तालुक्यात देखील 80 टक्क्यांहून अधिक मतदान पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडी विरुद्ध शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी असा सामना होतोय.
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन.पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक आणि ए. वाय. पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
इतर बातम्या:
KDCC bank Election Hasan Mushrif said Kolhapur District Cooperative bank Election happen due to some people in district