मुंबई: राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत (shivsena) बंडखोरी केल्यानंतर आता आरोप -प्रत्यारोपाचे राजकारण होताना दिसत आहे. शनिवारी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बोलताना बरं झालं शिवसेनेतून घाण गेली असं म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला बंडखोर आमदार दीपक केसरकर (Deepak Keasarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे हे डिसेंट आहेत, त्यांनी डिसेंटच राहावं असं केसरकर यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की शिवसेनेतून घाण गेली आणि पुन्हा तेच म्हणतात घाणीसाठी दरवाजे उघडे ठेवले हे कसं शक्य आहे? असा सवालही दिपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरे यांच्याबाबत मला आदर आहे, मात्र तो आदर त्यांच्या आजोबा, पंजोबांमुळे आहे, असेही यावेळी बोलताना केसरकर यांनी म्हटले आहे.
दीपक केसरकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते आदित्य ठाकरेंबद्दल देखील बोलले आहेत. मला आदित्य ठाकरे यांच्याबाबत आदर आहे. मात्र तो आदर त्यांच्या आजोबा, पंजोबांमुळे आहे. आता आदित्य ठाकरे यांनी ठरवावे की त्यांनी कोणती भाषा शिकायची उद्धव ठाकरे यांची की राऊत साहेबांची असे केसरकर यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की शिवसेनेतून घाण गेली आणि पुन्हा तेच म्हणतात घाणीसाठी दरवाजे उघडे ठेवले हे कसं शक्य आहे? असा सवालही दिपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे.
दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, पक्षप्रमुखांचं मन मोठंच आहे, हे केव्हाही मान्य करतो. मात्र पक्ष जेव्हा संपवण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्याकडे गांभीर्याने पहावं लागतं. कोणीही रस्त्यावर येऊन आंदोलन करू नये, मी पुन्हा पुन्हा विनंती करतो. माझ्यासोबत राठोड, भुसे, गुलाबराव पाटील आहेत त्यांना विचारा, त्यांच्यावर केसेस दाखल आहेत. गुलाबराव पाटील तर लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत तुरुंगात होते. तुम्ही अशा माणसांना पक्षातून घाण गेली बोलता. जमानाच वापरा आणि फेकून द्या वृत्तीचा झाला असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे.