मुंबई : राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत असतानाच शिंदे गटाचे (Cm Eknath Shinde) प्रवक्ते किरण पावसकर यांनी आज भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतलेली आहे. काल पत्रकार परिषदेत दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी राणेंबाबत एक मोठा वक्तव्य केलं होतं. नारायण राणे (Narayan Rane) यांनी वारंवार सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊन बदनामी करण्याचा डाव असल्याचा आरोप केसरकर यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर नारायण राणे हे नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र नारायण राणे यांच्या गोटातून याबाबत सौम्य प्रतिक्रिया उमटत होत्या, तर नारायण राणे यांच्या जवळचे नेते राजन तेली यांनी याबाबत केसरकारांवर हल्लाबोल चढवला होता, दीपक केसरकर यांना आवर घालावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती.
तर हिंदुत्वासाठी सर्वकाही माफ आहे, असे म्हणत नितेश राणे यांनी केसरकारांच्या बाबतीत मवाळ भूमिका घेतलेली पाहायला मिळाली. त्यानंतरच पावसकरांनी राणेंच्या घरी दाखल होत राणेंची भेट घेतली आहे. सुशांत सिंह राजपूत याचे प्रकरण अजून न्यायप्रविष्ठ आहे, त्यामध्ये अजून कोणताही निकाल लागलेला नाही. यामध्ये काही महत्त्वपूर्ण निकाल लागू शकतात, त्यामुळे केसरकारांचे हे वक्तव्य चुकीचं होतं, जर उद्या हे वक्तव्य ठाकरे यांच्या विरोधात गेलं तर आमच्याच पक्षाची बदनामी होईल असेही पावसरकर या भेटीनंतर म्हणाले आहेत.
केसरकारांनी जे वक्तव्य केले आहे, ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकेल, मात्र नारायण राणे हे आज केंद्रीय मंत्री आहेत, त्यामुळे मी त्यांच्याशी बोललो. आज भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं सरकार आहे. या सरकारमध्ये कुठेही कोणाच्या मनात काही राहू नये, जर एखादे वक्तव्य चुकीचे गेलं असेल तर त्या व्यक्तीला त्रास होऊ नये, म्हणून त्यांना वाईट वाटू नये यासाठी मी त्यांची मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन भेट घेतलेली आहे, अशी माहिती पावसकर यांनी दिली आहे.