मुंबई: राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी एका अधिकाऱ्याला तुम्ही दारू पिता का? अशी विचारणा केली. त्यावर राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी सडकून टीका केली आहे. कृषी मंत्री दारू घेणार का? असं विचारतात यावरून काय ते समजा असं त्यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेचा शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर (kiran pawaskar) यांनी समाचार घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मिटिंगवेळीही दारुच्या पार्ट्या व्हायच्या, असा गंभीर आरोप करतानाच या दारू पार्ट्यांच्या व्हिडिओ दाखवू का? असा इशाराच किरण पावसकर यांनी दिला आहे.
किरण पावसकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. तुम्हाला दारुच्या पार्ट्यांचे किती व्हिडिओ बघायचे आहेत? आदित्य ठाकरे यांच्या मिटिंग सुरू असताना दारु पार्ट्या व्हायच्या. या पार्ट्यांचे किती व्हिडिओ बघायचे आहेत? जर अशा पद्धतीने जाणार असाल. तर आम्हाला व्हिडीओ दाखवावे लागतील, असा इशारा किरण पावसकर यांनी दिला आहे.
काहीही झालं तरी मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. आता अब्दुल सत्तारांचा राजीनामा मागत आहेत. हे सत्तार तुमच्याकडे असताना शिवसेना भवनात पहिल्या रांगेत बसायचे. तेव्हा तुम्हाला आवडत होते. ही महत्त्वकांक्षा काय आहे? ही राक्षसी नाही? ही महत्त्वकांक्षा राक्षसी महत्त्वकांक्षांच्या पलिकडची आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.
ठाकरे सरकारमधील काही मंत्री स्वेच्छेने बाहेर पडले आहे. त्यांचा वरूण सरदेसाई राजीनामा मागत आहे. वरूण सरदेसाई कोणाचा राजीनामा मागत आहेत? जे कधी पंचायत समितीच्या निवडणुकीतही निवडून आले नाहीत. ते राजीनामा मागत आहे, असा टोला त्यांनी वरूण सरदेसाई यांना लगावला.
उदय सामंत ठाकरे सरकारसोबत होते तोपर्यंत चांगले होते. मग अशा तीन महिन्यात काय झालं की ते ना आवडते झाले?, असा सवाल त्यांनी केला. कोरोना काळात काहींचे रोजगार गेले, मात्र काहींना त्याचा चांगला फायदा झाला. पैसे चांगले मिळाले. तीन महिने झाले सरकार येऊन काम तर करू द्या. अडिच वर्षात तुम्ही काय केलं ते आधी सांगा; असं आव्हानच त्यांनी दिलं.