दापोली : अनिल परब यांचं कथित रिसॉर्ट पाडण्याच्या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) आज दापोलीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी दापोली पोलिसांकडे (Dapoli Police) एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही आणि रिसॉर्टकडेही जाऊ दिलं नाही. त्यामुळे सोमय्यांनी पोलिस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. मात्र त्याचीही दखल पोलिसांनी घेतली नाही. शेवटी सोमय्या आणि निलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत चालत परबांच्या कथित रिसॉर्टकडे निघाले. थोडे दूर गेल्यावर पोलिसांनी सोमय्या आणि राणेंना अडवलं. तेव्हा पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हायव्होल्टेड ड्रामा पाहायला मिळाला. पोलिसांनी टाकलेले बॅरिकेट्स ओलांडून जाण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्ते करत होते. त्यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला. शेवटी कायदा आणि सुव्यवस्था भंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी किरीट सोमय्या, निलेश राणे आणि निल सोमय्या यांना अटक केली. त्यानंतर त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय.
अनिल परब यांच्या कथित अनधिकृत रिसॉर्टविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यासाठी किरीट सोमय्या, निल सोमय्या आणि निलेश राणे शेकडो कार्यकर्त्यांसह दापोली दाखल झाले. जोरदार शक्तिप्रदर्शन केल्यानंतर सोमय्या, राणे दापोलीस पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना तासभर बसवून ठेवलं. त्यानंतर सोमय्या आणि निलेश राणे रिसॉर्टकडे जाण्यासाठी निघाले. मात्र, पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यापासून दुसरीकडे हलवल्याची माहिती निलेश राणेंना मिळाली. त्यामुळे संतापलेल्या सोमय्या यांनी दापोली पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरु केलं. सुमारे तीन तास ठिय्या दिल्यानंतर सोमय्या आणि राणे चालत रिसॉर्टकडे निघाले. मात्र, थोडं दूर गेल्यानंतर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून पुन्हा एकदा सोमय्या आणि राणेंना अटक केली. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आलं. तिथे अवघे पाच मिनिटे बसवल्यानंतर पोलिस सोमय्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेबाहेर सोडणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिलीय.
आम्ही जो सत्याच्या आग्रहासाठी आलो होतो. त्यासाठीचा आग्रह अजून सुरु आहे. सर्व्हे नंबर 446 जे रिसॉर्ट बांधले आहेत ते अनिल परब यांचे आहेत. अनिल परब यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. 30 तारखेला दापोली कोर्टात सुनावणी सुरु आहे भारत सरकारच्या याचिकेवर सुरु आहे. अनिल परब यांचा रिसॉर्ट तुटेपर्यंत तो रिसॉर्ट बांधण्यासाठी जो पैसा खर्च करण्यात आला त्यासंदर्भात ईडी, आयटी, ग्रीन ट्रिब्युनलकडे तक्रार केलीय. पोलिसांनी आम्हाला अटक केली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पलीकडे सोडणार आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले.
इतर बातम्या :