मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता ट्वीट करत ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र आता माफिया मुक्त होत आहे, असं म्हटलंय. तर दुसरीकडे आता भाजपचं पुढं लक्ष्य काय असणार आहे, हेही स्पष्ट केलंय. महाराष्ट्रा माफिया मुक्त केल्यानंतर आता मुंबईत महापालिका माफिया मुक्त करणार, असं त्यांनी ट्वीटमधून म्हटलंय. महाराष्ट्रात भाजपकडून (BJP Maharashtra) आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला अखेर पायउतार व्हावं लागलंय. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप सत्तेत येण्यासाठीचा मार्ग मोकळा झालाय. सत्तास्थापनेच्या वाटाघाटी आता सुरु असून किरीट सोमय्या पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून आलंय. किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात सनसनाटी आरोप करत खळबळ उडवून दिलेली होती.
संजय राऊत, अनिल परब आणि उद्धव ठाकरेंच्या कुटुंबीयांवरही अनिल परबांनी आर्थिक गैरव्यवहार, जमीन खरेदीतील गैरव्यवहार, यासह इतरही अनेक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप गेल्या अडीच वर्षात केलेले होते. या अडीच वर्षांच्या काळात किरीट सोमय्या हे सातत्यानं चर्चेत राहिलेले होते. मधल्या काळात त्यांच्यावर दोनवेळा हल्लाही झाला होती. यात किरीट सोमय्या जखमीही झाले होते.
महाराष्ट्र “माफिया” मुक्त होत आहे, आत्ता मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार@BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 30, 2022
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत आता विकासकामांना गती येईल, असा विश्वास व्यक्त केलाय. ‘महाराष्ट्रात नवीन सरकार येणार …पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, भाईंदर, वसई, नवी मुंबई, पनवेल …….. मेट्रो रेल्वेचे काम पुन्हा जलद गतीने सुरू होईल’ असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रात नवीन सरकार येणार …
पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, भाईंदर, वसई, नवी मुंबई, पनवेल …….. मेट्रो रेल्वेचे काम पुन्हा जलद गतीने सुरू होईल.@BJP4Maharashtra @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 30, 2022
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे 39 आमदार फुटले होते. त्यानंतर 9 अपक्ष आमदारही एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते. यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलेलं होतं. या सगळ्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिली होती. त्यानंतर बहुमताच्या चाचणीचं पत्र ठाकरेंना देण्यात आलं. या बहुमत चाचणीविरोधात सुप्रीम कोर्टात शिवसेनेनं आव्हान दिलं होतं. बहुमत चाचणी पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र ही मागणी अखेर फेटाळून लावण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं.