मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणात दंड ठोठावण्यात आला होता. त्याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दंड थोपाटले आहेत. ठाकरे सरकारनं प्रताप सरनाईक यांना 18 कोटींचं गिफ्ट देण्यात आलं आहे. भ्रष्टाचार करायचा आणि नंतर माफी द्यायची हे चालणार नाही. ठाकरे सरकारला सरनाईकांकडून 18 कोटी रुपये वसूल करावे लागणार आहेत. त्यासाठी मी न्यायालयात (court) धाव घेणार आहे. आज दुपारी एक वाजता कोर्टात याचिका सादर करणार आहे. पुढच्या आठवड्यात त्यावर सुनावणी होईल, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सरनाईक अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहे. तर सोमय्यांची ही याचिका कोर्ट दाखल करून घेते का? कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतल्यानंतर ठाकरे सरकार त्यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच सोमय्या या प्रकरणात कोर्टात काय युक्तिवाद करतात हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणं आहे.
किरीट सोमय्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. प्रताप सरनाईक यांना उद्धव ठाकरे यांनी 18 कोटींचं बक्षीस दिलं आहे. अनिधिकृत बांधकाम प्रकरणी हा दंड ठोठावला आहे. लोकायुक्तांनी स्वत: त्याची दखल घेतली आहे. तरीही उद्धव ठाकरे सरकार हा दंड माफ करते. हे चालणार नाही. ही ठोकशाही आहे. ही ठोकशाही माफिया सेनेपुरती मर्यादित राहिली आहे. आम्ही कोर्टात जाणार आहोत. त्यामुळे कॅबिनेटला आपला निर्णय मागे घ्यावा लागणार आहे. सरकारला 18 कोटी रुपये वसूल करावेच लागणार आहे. बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठीच आम्ही न्यायालयात जात आहोत, असं सोमय्या म्हणाले.
प्रताप सरनाईक यांचा ठाण्यात चांगलाच दबदबा आहे. त्यांच्या संपत्तीचीही नेहमी चर्चा होत असते. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात सरनाईकांची एकूण संपत्ती 126 कोटी इतकी होती. ठाण्यातील रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सरनाईकांचा चलती आहे. विहंग शांतीवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड आदी रहिवासी प्रकल्प त्यांनी निर्माण केले आहेत. ठाण्यात विहंग्ज इन हे थ्री स्टार हॉटेल. विहंग ग्रुपकडे विहंग्ज पाम क्लबचीही मालकी त्यांच्याकडेच आहे. यात स्वीमिंग पूल, हेल्थ क्लब आदी सुविधांचा समावेश आहे.