मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचे कार्यकर्ते आणि मुलुंड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ते पुन्हा आमने सामने येण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधामुळे किरीट सोमय्यांचं तिकीट भाजपला कापावं लागलं. त्याचा बदला म्हणून भाजप कार्यकर्ते शिवसेनेचे विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांचं तिकीट कापण्याची मागणी करत आहेत.
शिवसेनेने आमदार सुनील राऊत यांना उमेदवारी देऊ नये. त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव करण्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेनेबद्दल जहरी टीका केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत किरीट सोमय्या यांना उमेदवारी न देण्यावर शिवसैनिक अडून बसले होते. तसेच उमेदवारी दिल्यास त्यांना निवडणुकीत पाडण्याची तयारीही शिवसैनिकांनी केली होती. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत बाजी उलटली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आमदार सुनील राऊत यांना उमेदवार देऊ नये, त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव करु असं भाजप कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
वाचा : सोमय्यांना उमेदवारी दिल्यास, त्यांच्याविरोधात लाढणार : शिवसेना आमदार
लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपमध्ये बेबनाव निर्माण झाला होता. त्यावेळी हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करत होते. त्यावेळी भाजपचे तत्कालिन खासदार किरीट सोमय्या यांनी सेना पक्षनेतृत्त्वावर टीका केली होती. त्यामुळे शिवसैनिक किरीट सोमय्या यांच्यावर नाराज होते.
लोकसभा निवडणुकीत किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली जाऊ नये म्हणून शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. त्याचे नेतृत्त्व शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी केले होते. सोमय्या यांना उमेदवारी दिली तर त्यांना पाडण्याची धमकीही सुनील राऊत यांनी दिली होती. भाजपने अखेर सोमय्या यांना उमेदवारी न देता मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांचा प्रचार न करता सुनील राऊत यांनी निवडणुकीत स्वत:चाच प्रचार केल्याचा दावा भाजपचा आहे. त्यामुळे सुनील राऊत यांच्याबद्दल भाजप कार्यकर्ते नाराज आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत त्याची सव्याज भरपाई करण्याचा निर्धार आता भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. सुनील राऊत यांना उमेदवारी देऊ नये,अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होणार असल्याचे समजते. त्यानंतरही राऊत यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात प्रचार करुन त्यांना पाडू, असा निश्चय भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यान, शिवसेना-भाजपचा वाद चिघळणार हे निश्चित आहे.
कोण आहेत सुनील राऊत?
संबंधित बातम्या
शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या व्हिडीओने ईशान्य मुंबईत खळबळ
ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना डच्चू, भाजपकडून मनोज कोटक यांना उमेदवारी!