मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. त्यावेळी त्यांनी हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा असं थेट आव्हान दिलं आहे. कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झाल्यावर टीव्ही 9 मराठीशी बोलताना पुढील टार्गेट रश्मी ठाकरे असतील, असा इशाराच दिलाय. (Kirit Somaiya’s warning to CM Uddhav Thackeray and Rashmi Thackeray )
पुढील टार्गेट रश्मी ठाकरे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रश्मी वहिनींचा बंगले घेण्यासाठी वापर केला, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केलाय. संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र यात्रा करणार, असंही सोमय्या यांनी जाहीर केलं आहे. ठाकरे सरकारनं यापूर्वी लाठ्या काठ्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. मला अडवलं तर अजून घोटाळे बाहेर काढणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. मी पुराव्यांशिवाय बोलत नाही. संजय राऊत, अनिल परब, आनंदराव अडसूळ हे उत्तम उदाहरण आहेत. कोल्हापूर पोलिस अधीक्षकांना लाज वाटली पाहजे, ते सरकारसाठी काम करतात. मला कुणीही रोखू शकत नाही. माझा निर्णय ठाम आहे. कोल्हापुरात जाणार तिथे तिसरा डोळा बाहेर काढणार, अशा शब्दात सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिलाय.
सिद्धीविनायकाचं दर्शन घेऊन मी कोल्हापुरला अंबेमातेच्या दर्शनासाठी जात आहे. कोल्हापुरात अंबाबाईला प्रार्थना करणार की, तू शक्तीची माता आहे. तू पापाच्या राक्षसाचा वध केला होता. अंबेमातेच्या चरणी प्रार्थना करणार की भ्रष्टाचाररुपी राक्षस जो महाराष्ट्रात फोफावला आहे, त्याचा वध करण्याची शक्ती आम्हाला दे. त्यावेळी पत्रकारांनी सोमय्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला मागच्या वेळी पोलिसांनी कुठली नोटीस दिली आहे का? त्यावर सोमय्या म्हणाले की आता मी त्यांना नोटीस दिली आहे. मी शरद पवारांना नोटीस दिली, मी उद्धव ठाकरेंना नोटीस दिली. मी कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना सांगितलं, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की, तुमच्यात हिम्मत असेल तर मला थांबवून दाखवा. आम्ही जाणार, अंबाबाईचं दर्शन घेणार आणि त्या भ्रष्टाचाररुपी राक्षसाचा वध करणार, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिलाय.
ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरही सोमय्या यांनी जोरदार हल्ला चढवलाय. हसन मुश्रीफ मला या ना त्या प्रकारे थांबवण्याचा पयत्न करणार. उद्या मुश्रीफ यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या घोटाळ्याचीही तक्रार करणार, असा इशाराच सोमय्या यांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून यांनी केवळ लुटा हेच शिकलं आहे. मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आव्हान देतो की हिम्मत असेल तर मला थांबवा. पोलिसांचा गुंडांसारखा वापर केला. आता ते थांबवू शकणार नाहीत. हसन मुश्रीफ यांना तुरुंगात जाण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाहीत. हसन मुश्रीफ यांना कुणीही वाचवू शकणार नाही, असा दावाही सोमय्या यांनी यावेळी केलाय.
इतर बातम्या :
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला, ‘भारत बंद’वेळी नाना पटोलेंचा घणाघात
उद्धव ठाकरे म्हणाले, नंतर कॅप्टनला मैदान साफ करायला जावं लागतं, कनेक्शन काय?
Kirit Somaiya’s warning to CM Uddhav Thackeray and Rashmi Thackeray