महेश सावंत, सिंधुदुर्गः शिवसेनेचा ठाकरे (Thackeray) गट आणि भाजपचे राणे-पिता पुत्रात जोरदार शाब्दिक चकमक सुरु असतानाच राणेंनी (Nitesh Rane) कोकणात शिवसेना फोडण्याची मोहीम सुरु केली आहे. कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसल्याचं चित्र आहे. देवगड आणि वैभववाडी या दोन ठिकाणच्या शिवसेना (Shivsena) नेत्यांना भाजपात ओढण्यात नितेश राणे यशस्वी झाल्याचं दिसून येतंय.
देवगड तालुक्यात शिवसेनेला धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह दोन सरपंचांनी भाजपात प्रवेश केला आहे. देवगडमध्ये आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. दोन सरपंचांचा प्रवेश घडवून आमदार नितेश राणेंनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.
पावणाई ग्रामपंचायतचे सरपंच गोविंद जयवंत उर्फ पप्पू लाड व वानिवडे सरपंच प्राची घाडी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देवगड-जामसंडे येथील भाजप कार्यालयात हा प्रवेश केला.
तर देवगडपाठोपाठ वैभववाडी तालुक्यातही उद्धव ठाकरे सेनेला दणका दिला आहे.
वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावातील प्रमुख शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला आहे.
आमदार नितेश राणेंच्याच नेतृत्वात ही बंडखोरी झाली.
वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावातील तंटामुक्ती अध्यक्ष रमेश पाटील, सोसायटी संचालक विलास पोवार, दुध डेअरी चेअरमन दशरथ पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश झाला.
दरम्यान, उद्धव ठाकरे गट आणि नितेश राणे यांच्यातील वाद दिवसेंदिवस विकोपाला गेल्याची चिन्ह आहेत. मंगळवारी ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. मध्यरात्री घरावर दगडफेक झाली तसेच घराच्या आवारात स्टंप आणि पेट्रोलच्या बाटल्या दिसून आल्या.
हा हल्ला राणे समर्थकांनी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. नितेश राणे यांनीदेखील नारायण राणेंविरोधात काही बोलल्यास कार्यकर्ते असंच प्रत्युत्तर देतील, असं म्हटलं. मात्र हल्ला नेमका कुणी केला, याचा तपास पोलीसांनी करावा, असंही राणे म्हणाले.