कोल्हापूर : गोकुळ दूधसंघाची निवडणूक (Kolhapur Gokul Doodh Sangh Election) होणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. निवडणुकीला स्थगिती देण्याबाबत सत्ताधारी गटाने केलेली याचिका कोर्टात फेटाळण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत गोकुळ दूधसंघाची निवडणूक घेण्यास ग्रीन सिग्नल दिला. (Kolhapur Gokul Doodh Sangh Election Supreme Court gives green signal)
गोकुळ दूधसंघातील सत्तारुढ गटाने निवडणुकीला स्थगिती देण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात राज्य सरकारला 26 एप्रिलपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने गोकुळ दूधसंघाची निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट केलं.
“सत्ताधारी गटाने जागतिक कोर्टात जाऊ नये”
कोल्हापूर दूध संघाच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. 36 ऐवजी 70 ठिकाणी मतदान बूथ तयार करण्याच्या कोर्टाच्या सूचना आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक व्यवस्थित पार पडेल. आता सत्ताधारी गटाने जागतिक कोर्टात जाऊ नये. कोर्टाच्या सूचनांचे पालन करून निवडणूक होईल. पॉझिटिव्ह आलेल्या ठरावधारकांना शेवटच्या तासात पीपीई किट घालून मतदान करु दिलं जाईल, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.
सतेज पाटील काय म्हणाले होते?
गोकुळ दूधसंघ निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात केवळ 3700 मतदार आहेत. तालुक्याच्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 35 बूथ या प्रक्रियेसाठी असणार असून प्रत्येक बूथमध्ये 100 मतदान असणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि पंढरपूर पोटनिवडणूक पार पडली. मग या निवडणुकीला स्थगिती देण्यास सत्तारुढ गटाचा अट्टहास का? असा सवाल काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला होता. सत्तारुढ गटाने आत्मविश्वास गमावल्याने त्यांची कोर्टकचेरी सुरु आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.
कधी होणार निवडणूक?
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. कोरोना परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरापासून लांबलेली ही निवडणूक 2 मे रोजी होणार आहे. मतदानाला काही दिवस बाकी असले, तरी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण गेल्या दोन महिन्यांआधीच तापायला सुरुवात झाली होती.
गोकुळ निवडणुकीचा उत्साह शिगेला
गोकुळ बचाव समितीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून सत्ताधारी महाडिक गटाविरुद्ध भूमिका घेणाऱ्या पालकमंत्री सतेज पाटील या निवडणुकीसाठी चांगलीच तयारी केलीय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना एकत्र आणत सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा केली. मात्र अवघ्या चार दिवसात त्यात फूट पडली. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी आघाडीची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केला. गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत राहणार असल्याचं सरुडकरांनी स्पष्ट केलं.
गोकुळ दूध संघ का आहे महत्त्वाचा?
दूध संघाचा जिल्ह्यात आणि राज्यात लौकिक
रोज 30 ते 35 लाख लिटर दुधाचं संकलन
मुंबई पुण्यासह अनेक मोठ्या शहरात गोकुळ दुधाला मागणी
गोकुळची रोजची कोट्यवधीची उलाढाल
गोकुळ दूध संघावर सत्ता म्हणजे जिल्ह्यात वर्चस्व असा अलिखित प्रघात
कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
2 मे – मतदान
4 मे – मतमोजणी
संबंधित बातम्या :
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं, 2 मे रोजी मतदान
सत्ताधारी गटातील संचालक विरोधकांच्या गळाला, गोकुळ दूध संघ निवडणुकीत चुरस
(Kolhapur Gokul Doodh Sangh Election Supreme Court gives green signal)