कोल्हापूर: एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, हे एकमेकांबाबत आगामी लोकसभेत कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष आहे. मात्र आता धनंजय महाडिक यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक पाऊल मागे टाकण्याचं वक्तव्य केलं आहे. पवार साहेबांनी (शरद पवार) आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन, असं धनंजय महाडिक यांनी म्हटलं.
धनंजय महाडिक म्हणाले, “पवार साहेबांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन. सतेज पाटील आणि माझी मैत्री चांगली होती. सतेज पाटील हे आघाडीचा निर्णय मान्य करतील. लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांचा विरोध मावळेल असं मला वाटतं. गेल्या विधानसभेला आघाडी झाली असती तर मी सतेज पाटील यांच्या प्रचाराला गेलो असतो. गेल्या वेळी ते त्यांच्या कर्माने पराभूत झाले”
मुन्ना-बंटी यांचा वाद काय?
डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे राजकारणातील कट्टर शत्रू मानले जाणारे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. हे दोघेही एकमेकांचे हाडवैरी आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पाठिंबा मागितला होता. त्यानंतर सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यासोबतचं वैर विसरुन, त्यांना निवडून आणण्याची शपथ घेतली होती. इतकंच नाही तर मोदी लाटेत धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार निवडूनही आले होते. सतेज पाटलांच्या पाठिंब्यामुळे धनंजय महाडिक निवडून आले.
वाचा: कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!
मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली. त्यामुळे सतेज पाटील यांच्याविरोधात भाजपकडून धनंजय महाडिकांचा चुलत भाऊ आणि महादेवराव महाडिकांचे सुपुत्र अमल महाडिक उभे राहिले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काँटे की लढाई झाली. या निवडणुकीत सतेज पाटील यांना हरवण्यासाठी धनंजय महाडिक यांनी प्रचंड जोर लावला. त्याचा परिणाम म्हणून तत्कालिन गृहराज्यमंत्री असलेले सतेज पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे बंटी-मुन्ना पुन्हा एकदा कट्टर शत्रू बनले. लोकसभा निवडणुकीत मदत करुनही धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत धोकेबाजी केल्याचा आरोप सतेज पाटील यांचा आहे.
याशिवाय काँग्रेसचे विधानपरिषदेचे तत्कालीन आमदार असलेले महादेवराव महाडिक यांनीही काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार न करता, निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या मुलाचा प्रचार करुन, सतेज पाटील यांचा पराभव केला.
या सर्वांचा वचपा सतेज पाटील यांनी 2015 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काढला. सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव केला. तेव्हापासून महाडिक विरुद्ध बंटी असा सामना कोल्हापुरात सातत्याने रंगला आहे. मग ती जिल्हा परिषद निवडणूक असो, महापालिका निवडणूक असो, गोकुळ दूधसंघ निवडणूक असो वा साखर कारखान्याची निवडणूक असो, सर्व ठिकाणी मुन्ना विरुद्ध बंटी असा सामना पाहायला मिळतो.