भूषण पाटील, कोल्हापूरः माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात आज पहाटेपासूनच ईडीने (ED Raid) छापेमारी सुरु केली. ही बातमी सकाळीच वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली. सकाळपासूनच कोल्हापुरात (Kolhapur) कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर निषेध नोंदवायला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्या घरासमोर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली.
तसेच हसन मुश्रीफ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी कागल तसेच मतदारसंघ बंदची हाक दिली आहे.
कोल्हापूर जिल्हाभरातून कागलमध्ये मुश्रीफ यांचे हजारो कार्यकर्ते जमा झाले आहेत.
साहेबांवर झालेला अन्याय हा जनतेवर झालेला अन्याय आहे. अशा लोकांना जनता माफ करणार नाही. हे भाजपचं षडयंत्र आहे. इथे कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही…. अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.
मुश्रीफ हे आमचं दैवत आहे, त्यांच्या बदनामीचा हा कट आहे. ही कोल्हापूरची, शाहू-फुले आंबेडकरांची पुरोगामींची जनता आहे. या विचारांचा माणूस भाजपात यावा, यासाठी ही मुद्दाम धाड पडत आहे…
याआधीही अशी छापेमारी झाली होती. तेव्हाही फक्त लोकांची कागदपत्र मिळाली. आताही तेच होणार आहे. भाजप केवळ राजकीय सूडापोटी हे करत आहे. आम्ही कोल्हापूर जिल्हा आणि कागल तालुका बंद करण्याचं आवाहन आम्ही करत आहोत, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
कागलमध्ये शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचा निषेध सुरु असतानाच मुश्रीफ यांनी एका व्हिडिओद्वारे कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, प्रसार माध्यमांतून कागल आणि तालुका बंद करण्याची घोषणा केली आहे, ती मागे घ्यावी. सरकारला संपूर्ण सहकार्य करावं. कायदा व सुव्यवस्था हाती घेण्याचं कृत्या माझ्यासाठी करू नये, अशी विनंती करतो…
यापूर्वीही असे छापे पडले होते. केंद्रीय यंत्रणांनी सर्व माहिती घेतली होती. ३०-३५ वर्षांचं माझं सार्वजनिक जीवन लोकांसमोर आहे. पुन्हा कोणत्या हेतूने छापा टाकला आहे, याची कल्पना नाही. तरीही कार्यकर्त्यांनी शांततेनं घ्यावं, असं आवाहन मुश्रीफ यांनी केलंय..